नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दोनशे कोटींच्या म्युनिसिपल बॉण्ड उभारणीला राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)च्या अंतिम मान्यतेसाठी सादर केला आहे. सेबीच्या मान्यतेनंतर हे बॉण्ड बाजारात आणले जाणार आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने १५ हजार कोटींचा आराखडा राज्य शासनाला सादर केला आहे. मात्र अद्याप या आराखड्याला मंजुरी मिळू शकलेली नाही. सिंहस्थ कामांसाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात एक हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य झाल्या. त्याआधारे कुंभमेळा प्राधिकरणाने ५,१४० कोटींच्या कामांना चालना दिली आहे. यात नाशिक महापालिकेच्या ३२७७.५८ कोटींच्या कामांचा समावेश आहे. त्यात १००४.१२ कोटींची कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पुर्ण करायची आहेत. एकीकडे शासनाचा निधी घेताना महापालिकेला देखील स्वनिधी खर्च करावा लागणार आहे. यासाठी २०२४-२५ च्या वार्षिक अंदाजपत्रकात २२५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. तर सन २०२५-२६ च्या महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात २०० कोटी रुपये तरतुद करण्यात आली.
म्युनिसिपल बॉण्ड उभारणीसाठी मर्चंट बँक म्हणून ए. के. कॅपिटल या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व प्रथम दोनशे कोटींचे म्युनिसिपल बॉण्ड उभारले जाणार आहे. त्यानंतर दोनशे कोटींच्या ग्रीन बॉण्ड उभारणीची प्रक्रिया राबविली आहे.दत्तात्रय पाथरूट, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका.
निधी उभारण्यासाठी हरित रोखे (ग्रीन बॉण्ड) दोनशे कोटी तर २०० कोटींचे म्युनिसिपल बॉण्ड उभारले जाणार आहेत. महापालिकांना नागरी विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारता येतात त्यासाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून १०० कोटी रुपयांचा निधी अर्बन चॅलेंज फंडातून उभारले जाणार आहे. या बॉण्ड उभारणीला राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात म्युनिसिपल बॉण्डचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सेबीला सादर करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट यांनी दिली.