नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने मंजूर केलेल्या १४६ कोटींच्या 'राम काल पथ' योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला पुढील आठवड्यात सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात सीतागुंफा, श्री काळाराम मंदिर, रामकुंड या मार्गावरील सुशोभीकरणाच्या कामांवर १८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
देशभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने २३ राज्यांमधील ४० प्रकल्पांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य योजनेंतर्गत मान्यता दिली आहे. या प्रकल्पांवर ३,२९५ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च केला जाणार असून, त्याद्वारे जागतिक मानांकनानुसार पर्यटन केंद्रांचा विकास करण्याची योजना आहे. यात महाराष्ट्रातील नाशिक व सिंधुदुर्ग या दोन शहरांमधील प्रकल्पांचा समावेश आहे. नाशिक शहरात राम काल पथ उभारण्यासाठी ९९.१४ कोटी, तर सिंधुदुर्गकरिता ४६.९१ कोटींचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे. राम काल पथ प्रकल्पाचा एकूण खर्च १४६ कोटी आहे. उर्वरित ४७ कोटींचा निधी राज्य शासन व महापालिकेच्या आर्थिक सहभागातून खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अहमदाबाद येथील मे. एचसीपी डिझाइन प्लॅनिंग ॲण्ड मॅनेजमेंट कंपनीला काम दिले आहे. या कंपनीने गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंट, वाराणसी तसेच मुळा व मुठा नद्यांच्या सुशोभीकरणाची कामे केली आहेत. दरम्यान, अहिल्यादेवी होळकर पूल ते टाळकुटेश्वर पूल या दरम्यान सुशोभीकरण, सीतागुंफा ते श्री काळाराम मंदिर व रामकुंडापर्यंतचा भाग राम काल पथ योजनेंतर्गत विकसित केला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये या कामाचा समावेश करण्यात आला आहे. नुकतेच या प्रकल्पाचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले असून, ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
सीतागुंफा ते श्री काळाराम मंदिर सुशोभीकरण.
श्री काळाराम मंदिर ते रामकुंड परिसराचे सौंदर्यीकरण.
अहिल्यादेवी होळकर पूल परिसर, गांधी तलाव, रामकुंड भागात सौंदर्यीकरण.
गांधी तलाव व रामकुंड परिसरात प्रभू श्रीरामाची धनुर्धारी भव्य प्रतिकृती.
टाळकुटेश्वर पुलापर्यंत पुतळे, शिल्प, स्तंभ, विद्युत रोषणाई.
राम काल पथ या महत्त्वाकांक्षी योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कालबद्ध कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. किमान पहिल्या टप्प्यातील काम या कालावधीत सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून येत्या मंगळवारी कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे.मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका, नाशिक.