नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करताना नाशिकच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केले.
महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी (दि. ७) नूतन उपमहापौर विलास शिंदे, उपनेते तथा जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नवनिर्वाचित उपमहापौर शिंदे यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. केंद्र व राज्यात महायुतीची सत्ता आहे. सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये युतीचीच सत्ता अपेक्षित होती. किंबहुना अडथळामुक्त विकासासाठी युती होणे नाशिकच्या हिताचेच होते. त्यामुळे भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थात नाशिकचे जागतिक पातळीवर ब्रँडिंग करण्याची संधी आहे. चांगले काम करा, नाशिकचा विकास करून नागरिकांना सुविधा पुरवा, असे नमूद करत नाशिकच्या दौऱ्यावर मी लवकरच येणार असून, सर्व नगरसेवकांची भेट घेणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्याच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून नाशिकच्या विकासासाठी प्रकल्प सुचवा, निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही शिंदे यांनी यावेळी दिली. यावेळी नगरसेवक प्रवीण जाधव, रमेश धोंगडे, दीपक दातीर, कैलास मुदलीयार, विक्रम नागरे, प्रमोद पालवे, निवृत्ती इंगोले, मामा ठाकरे, समीर कांबळे, राहुल दिवे आदी उपस्थित होते.
ठाण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्याची ग्वाही शिंदे यांनी दिल्यानंतर उपनेते अजय बोरस्ते यांनी नाशिककरांच्या वतीने काही मागण्या शिंदे यांच्यासमोर मांडल्या. ठाण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास होण्यासाठी एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींची पुरेपूर अंमलबजावणी केली जावी. विकासकांना इन्सेंटिव्ह टीडीआरच्या माध्यमातून सवलत देऊन बांधकाम क्षेत्राला चालना द्यावी. नऊ मीटर सन्मुख बांधकामांना ठाण्याच्या धर्तीवर एफएसआय मिळावा आदी मागण्या यावेळी बोरस्ते यांनी मांडल्या.