नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीसाठी मलनिस्सारण केंद्रांची उभारणी महत्त्वाची आहे. मलनिस्सारण केंद्र उभारणीसाठी वृक्षतोड करायची नाही, तर गोदावरी नदी प्रदूषित ठेवायची का? असा सवाल कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना केला आहे.
हरित कुंभ प्रारंभासह विविध प्रकल्पांच्या ई-भूमिपूजन सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री महाजन बोलत होते. ते म्हणाले की, गोदावरी नदीची आपण पूजा करतो, गोदामाईला आईसमान मानतो. परंतु कुंभमेळ्यात गोदेचे पाणी तीर्थ म्हणून कुणी पिणार नाही. गोदावरी प्रदूषित आहे, ही वस्तुस्थिती आहे. मलमूत्र, सांडपाणी, कारखान्यांचे केमिकलयुक्त पाणी गोदावरीत मिसळत आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात गोदावरी स्वच्छतेला प्रथम प्राधान्य आहे. गोदावरी नदीला पवित्र करायचे आहे. त्यासाठी कितीही पैसे लागले, तरी चालेल अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच मलनिस्सारण प्रकल्प उभारला जात आहे.
नाशिककरांनी स्वच्छ गोदावरीसाठी सहकार्य करावे, शहराची बदनामी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन महाजन यांनी केले. सर्व योजना दीड वर्षांत कार्यान्वित होतील नाशिककरांनी निश्चिंत राहावे, अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत, रस्ते खोदलेले आहेत, थोडे दिवस त्रास सहन करावा लागेल परंतु कायमस्वरूपी मार्ग निघेल असे आश्वासन महाजन यांनी दिले. शहरात व्हाइट टॅपिंगचे रस्ते तयार केले जात आहेत, असेही महाजन यांनी सांगितले.
नावलौकिक कायम ठेवू
एसटीपीसाठी 200 झाडे तोडली, तर आमची बाजू समजून घ्या. मागील कुंभमेळ्यात जी झाडे होती, ती राहतील, त्यातील एकही झाड तोडणार नाही. नाशिक शहर तुमचं-आमचं आहे. राज्यात लोक नाशिकला प्राध्यान्य देतात. पुण्यापेक्षा नाशिकला लोक राहायला पसंती देतात. आध्यात्मिक शहर आहे. आम्ही उजाड करत नाही. आपल्या शहराची बदनामी होणार नाही याची काळजी घेण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे महाजन यांनी सांगितले.