Dr. Pravin Gedam Pudhari News Network
नाशिक

Kumbh Mela Development Authority : मंदिर संवर्धनाचे काम वेळेत करा

प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रविण गेडाम यांचे पुरातत्व विभागाला आदेश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळ्यासाठी देश विदेशातील कोट्यवधी भाविक येतील. कुंभमेळ्यातील अमृत स्नानाबरोबरच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या प्राचीन मंदिरांना भेट देतील. त्यामुळे पुरातत्व विभागाने त्यांच्याकडील मंदिर संवर्धनाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, अशी दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रविण गेडाम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे विविध विषयांवर चर्चेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसरंक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, भारतीय पुरातत्व विभागाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाचे अधीक्षक शिवकुमार भगत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक बी. डी. पाटील, ज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष डॉ. गेडाम म्हणाले की, कुंभमेळा कालावधीत नाशिकचे धार्मिकतेबरोबरच ऐतिहासिक व पर्यटन दृष्टीने ब्रॅण्डिंग आवश्यक आहेत. यासाठी शहर व परिसरातील सर्व पुरातन मंदिरे, धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनस्थळांचाही विकास होणे आवश्यक आहे. यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहेत. यासाठी सर्व संबंधित विभागांनी भाविक व पर्यटकांना आकर्षित करेल अशी विकासकामे नियोजनपूर्वक करावीत. प्राचीन मंदिरांच्या परिसरात त्यांचे महत्व विशद करणारे माहितीफलक उभारावेत. प्राचीन मंदिरांच्या ठिकाणी पौराणिक संदर्भाच्या अनुषंगाने सुशोभीकरणाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी स्वामीनारायण मंदिर, नारोशंकर मंदिर, अजगरेश्वर बाबा समाधी, काशी विश्वेश्वर मंदिर, एकमुखी दत्त मंदिर ते बालाजी कोट, सांडव्यावरची देवी मंदिर संवर्धनाचे सुरू असलेल्या कामांचा तसेच त्र्यंबकेश्वर येथील प्रयागतीर्थ, गौतमेश्वर मंदिर, संगमतीर्थ, जुने कुशावर्त, इंद्रकुंड, मुकुंदतीर्थ, दर्शनपथ येथे करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. या कामांचे सादरीकरण गोटे यांनी केले. वन विभागामार्फत ब्रह्मगिरी व अंजनेरी पर्वत येथे होणाऱ्या कामांची माहिती उपवनसंरक्षक सावर्डेकर यांनी दिली. भविष्यात पहिने, दुगारवाडी, हरिहरगड, कावनई येथे करावयाच्या कामांबाबतही चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT