नाशिक : जिल्हा कृषी विभागाच्या वतीने 12 ते 16 मार्चदरम्यान नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा ‘कृषिकुंभ 2026’ या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे 400 हून अधिक स्टॉल्स लावण्यात येणार आहे. तसेच या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत.
प्रदर्शन हे युथ फेस्टिव्हल मैदान, पार्क साइट्स शेजारी, बळी मंदिर चौक येथे भरणार आहे. दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. लाखोंच्या संख्यने शेतकरी या प्रदर्शनाला भेट देत असतात. त्यामुळे प्रदर्शनाची जय्यत तयारी कृषी विभागाकडून सुरू आहे. प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात एआयचा वापर, कर्ज प्रक्रिया, कृषी यांत्रिकीकरण, काढणी नंतरचे तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान, नैसर्गिक शेती आणि कृषी क्षेत्रातील संशोधन संस्थांचा सहभाग असणार आहे.
तसेच शहरी ग्राहकांसाठी गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ अशा विविध धान्यांचे प्रदर्शन व विक्री व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. हायड्रोपोनिक्स शेती, परदेशी भाजीपाला लागवड, कृषी यांत्रिकीकरण, बियाणे व दर्जेदार निविष्ठा, एआय आधारित शेती, बायोचार व नैसर्गिक शेती, जलतारा व पाणलोट मॉडेल, ग्रेप कव्हर व क्रॉप कव्हर तंत्रज्ञान, कृषी ड्रोन प्रात्यक्षिक, द्राक्ष व कांदा नवतंत्रज्ञान आदींचे प्रदर्शनात आकर्षण असणार आहे.
विशेष उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम
कृषी प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त महिला शेतकरी सन्मान सोहळा, तसेच प्रयोगशील शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांचा सन्मान सोहळा, प्रत्येक गावातून शेतकरी भेटीचे नियोजन, प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रात्यक्षिके आदी उपक्रमांचा समावेश असेल. याशिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रा, फोक कला, पारंपरिक लोककला कार्यक्रम, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सादरीकरण या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून एक लाख शेतकऱ्यांना आणण्याचे नियोजन केले आहे. तसेच इतर शेतकरी गृहीत धरले तर दोन ते अडीच लाख शेतकरी कृषी प्रदर्शनाला भेट देतील असा अंदाज आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक तंत्रज्ञानासह विविध प्रात्यक्षिके अनुभवयास मिळणार आहे.रवींद्र माने, जिल्हा कृषी अधीक्षक