अडीच वर्षांपासून 'किसान रेल्वे' यार्डात file photo
नाशिक

Kisan Railway | अडीच वर्षांपासून 'किसान रेल्वे' यार्डात

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : गौरव जोशी

काेरोना काळात भारतीय रेल्वेने सुरु केलेली किसान रेल्वे मागील अडीच वर्षापासून बंद करण्यात आल्या आहेत. कोळसा वाहतूकीचे कारण देत रेल्वेनही किसान रेल्वेला रेड सिग्नल दाखविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ही सेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालासह दुध, मास व मासे यांच्या जलद वाहतूकीसाठी रेल्वे मंत्रालयाने ७ आॅगस्ट २०२२ रोजी पहिली किसान रेल्वे सुरु केली. देवळाली ते दानापुर (बिहार) या पहिल्या सेवेला वाजतगाजत हिरवा कंदिल दाखविण्यात आला. या सेवेमुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कांदा, केळी, भाजीपाला तसेच अन्य शेतमाल अवघ्या २४ ते ३६ तासांत दिल्ली, बिहार राज्यापर्यत पोहचत होता. कमी खर्चात व वेळेत माल पाठविणे शक्य होत असल्याने अल्पावधीतच ही रेल्वेसेवा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली. मात्र, २०२१ च्या अखेरीस देशभरात कोळश्याच्या तुटवडा भासत असल्याने अनेक राज्यांवर वीज संकट ऊभे ठाकले. परिणामी त्या कालावधीत रेल्वे मंत्रालयाने कोळसा वाहतूकीसाठी विशेष ट्रेन्स चालविल्या. या ट्रेन्स‌च्या नावाखाली रेल्वे मंत्रालयाने जानेवारी २०२२ पासून किसान रेल्वे थेट यार्डात धाडल्या.

गेल्या अडीच वर्षापासून देशभरातील किसान रेल्वे बंद पडल्या आहेत. त्यामूळे शेतकरी रेल्वेच्या एसएलआर सेवेमार्फत किंवा रस्तेमार्गाने त्यांचा शेतमाल परराज्यात पाठवित आहेत. मात्र, या दोन्ही सेवा वेळकाढू तसेच खर्चिक आहे. तसेच रस्तेमार्गे मालाची वाहतूक करताना मालाची हाताळणी व आदळ आपट होत असल्याने सुमारे २० टक्के माल खराब होतो. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही सर्व बाबी बघता रेल्वे मंत्रालयाने किसान रेल्वे पुर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी शेतकरीवर्गात केली जात आहेत.

२६० कोटींचा महसुल

देशातील पहिली किसान रेल्वे चालविण्याचा मान मध्य रेल्वेने पटकाविला देवळाली ते दानापूर अशी सेवा आठवड्यातून एकदा सुरू करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रतिसाद बघता देवळालीहून आठवड्यातील चार दिवस व नंतर दररोज ही सेवा सुरु झाली. त्यानंतर सोलापूर येथून किसान रेल्वे धावायला लागली. ही रेल्वे मनमाड येथे देवळाली-दानापूर रेल्वेला जोडून पुढे रवाना केली जायची. जानेवारी २०२२ पर्यंत मध्य रेल्वेच्या मार्गावर किसान रेल्वेच्या १ हजार फेऱ्या पूर्ण करताना 260 कोटींचा महसूल मिळवला होता.

देशभरातून १८ रेल्वेसेवा

देवळाली-दानापूरनंतर देशभरातील रेल्वेच्या विविध मार्गावर किसान रेल्वेच्या आणखीन १७ सेवा सुरु करण्यात आल्या. विशेष म्हणजे यातील सहा सेवा या दक्षिण-मध्य रेल्वेच्या नगरसुल रेल्वे स्थानक (ता. येवला) येथून सुरु होत्या. या सेवांमुळे मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थान, बिहार तसेच बांगलादेशच्या सीमेपर्यंत कमी कालावधीत शेतमाल पोहचविला जात होता.

रोजगाराला फटका

किसान रेल्वेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना मिळाली होती. शेतातील माल काढून तो रेल्वे स्थानकापर्यंत वेळेत पोहचविण्यापर्यंत विविध घटकांचा समावेश असायचा. यातून युवकांना रोजगाराचे साधन मिळाले. सध्या रेल्वेच्या एसएलआर सेवेद्वारे माल पोहच होत असला तरी त्याला मर्यादा आहे. परिणामी रोजगाराला फटका बसला आहे. दरम्यान, रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यास पुन्हा एकदा किसान रेल्वे सुरु हाेऊ शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT