नाशिक : कॉलेजरोड परिसरातून खासगी क्लाससाठी गेलेल्या 15 वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
पीडित विद्यार्थिनी सातपूर येथील पारिजात नगरमधील वनविहार कॉलनीत आपल्या कुटुंबासोबत राहते. ती नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली असून, पुढील शिक्षणासाठी कॉलेजरोड येथील एका खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. मंगळवारी (दि. 17) सकाळी ती नेहमीप्रमाणे क्लासला गेली; मात्र सायंकाळी घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा परिसरात, नातेवाइकांकडे व मैत्रिणींकडे शोध घेतला; पण तिचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. तिच्या आईने गंगापूर पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली आहे. सीसीटीव्ही तपासणीसह चौकशी सुरू आहे.