File Photo
नाशिक

Nashik News : कसबे वणी मंदिर चोरी प्रकरणाचा छडा; दोन आरोपींना वणी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

वणी : कसबे वणी येथील श्रीराम मंदिर व मारुती मंदिरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात वणी पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजय अशोक सोळंकी (वय ३१, रा. लेंडापुरा, वणी) आणि रोहित संजय गावित (वय २४, रा. लेंडापुरा, वणी) यांचा समावेश आहे.

राम मंदिराचे पुजारी रामचंद्र रघुनाथ चंद्रात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी राम मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्तींवरील चांदीचे कमरपट्टे, मारुतीच्या मूर्तीवरील चांदीचा गोटा तसेच दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण १६ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव व पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे लेंडापुरा येथील दोघा संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

कसबे वणीतील दोन मंदिरांमध्ये झालेल्या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अल्पावधीतच गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात वणी पोलिसांना यश आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT