वावी : दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबा मंदिरास करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर ढवळून निघाला होता. कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला, त्याचबरोबर संस्थानच्या वतीने सर्व भाविकांची व्यवस्था करण्यात आली होती.
विशेषतः गुजरात, आंध्र प्रदेश, दिल्ली, मुंबई या भागांतून येणार्या साईभक्तांचा ओढा जास्त दिसून आल्याचे संस्थान प्रशासकीय विभागाने सांगितले. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने कार्तिकी एकादशी हा स्थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. कार्तिकी एकादशीनिमित्त श्री साई प्रसादालयात साबुदाणा खिचडी महाप्रसादाकरिता 52 पोते साबुदाणा, 23 पोते शेंगदाणे, 665 किलो तूप आणि सुमारे 2000 किलो बटाटे आदी साहित्याचा वापर केला. सकाळी 24,600 भाविकांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला.
कार्तिक शु ॥ 11 शके 1946 कार्तिकी एकादशी या दिवसाचे औचित्य साधून संस्थानने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रात्री 8 ते 9 या वेळेत मंदिर कर्मचारी धर्मराज उपाडे यांचा कीर्तन कार्यक्रम झाला. रात्री 9.15 वाजता श्रींच्या पालखीची मिरवणूक शिर्डी गावातून काढण्यात आली. पालखी समाधी मंदिरात परतल्यानंतर श्रींची शेजारती करण्यात आली.