नाशिक : विद्यार्थी हे राष्ट्र आणि मानवजातीचे भविष्य मानले जातात. शिक्षक हा त्यांच्या प्रगतीसाठी विश्वासार्ह मार्गदर्शक असतो. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात. पर्यायाने समाजासाठीही दीपस्तंभाप्रमाणे कार्य करतात. अशा या समाजातील कर्मयोगी शिक्षकांचा रविवारी (दि. ७) 'शिक्षकरत्न पुरस्कार २०२५'ने गौरव केला जाणार आहे.
दैनिक 'पुढारी' आणि संदीप सायन्स इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील रावसाहेब थाेरात सभागृहात सकाळी ९ वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात शहर व जिल्ह्यातील ४८ शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, संदीप सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक संदीप घायाळ उपस्थित राहणार आहेत.
स्मृतीचिन्ह देत कर्मयोगी शिक्षकांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. पुरस्कार प्राप्त सर्वच शिक्षकांचे समाजात भरीव योगदान आहे. त्यांनी अनेक पिढ्या घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. काही शिक्षक प्रतिकुल परिस्थितीत अध्यापन कार्य करत विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत आहेत. या सर्व शिक्षकांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला असून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना 'शिक्षकरत्न' पुरस्काराने गौरवले जाणार आहे.
हा पुरस्कार शिक्षकांच्या कार्याचा यथोचित गौरव करणारा ठरणार आहे. त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी मोठी उभारी देणारा ठरणार आहे. सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्य करताना स्वत:ला सिद्ध करत समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या आदर्शवत कार्याचा गौरव करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्कारप्राप्तींचा प्रेरणादायी प्रवास
दैनिक 'पुढारी' आणि संदीप सायन्स इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या 'शिक्षकरत्न' पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा प्रेरणादायी प्रवास आहे. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त शिक्षकांच्या या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. प्रत्येक शिक्षकांचा प्रवास हा ऊर्जा देणारा आहे. सोहळ्यानिमित्त त्यास उजाळा मिळणार आहे.