नाशिक: मध्य रेल्वेच्या नाशिकरोड ते ओढा स्थानकादरम्यान शनिवारी (दि.18) रात्री सुमारे नऊ वाजता घडलेल्या भीषण घटनेत तीन तरुणांनी कर्मभूमी एक्स्प्रेसखाली येऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक माहिती लोको पायलटने पोलिसांना दिल्याने अपघात कि जीवनयात्रा संपवली याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे.
तिघांचा सामुहीक जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न
मृतांमध्ये भाबर मानसिंगभाई बाबूभाई (२५) आणि जीजस भाई लालचंद भाई ताबलीयार (३९) यांचा समावेश असून, जमील भाई अमलियार हा तरुण गंभीर जखमी आहे. जखमीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या तिघांनी एकत्रितपणे जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न का केला, यामागील कारणाचा अद्याप उलगडा झालेला नाही. जखमी तरुणाच्या जबाबानंतर या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
लोको पायलट एस. देटे यांनी ओढा स्थानकाचे डीवायएसएस आकाश भारद्वाज यांना घटनेची माहिती दिल्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना रेल्वे मार्गावर दोन मृतदेह आढळले, तर तिसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत होता.
Nashik Latest News
नाशिक रोड पोलिसांची माहिती
सदर तीनही युवक दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मालेगाव येथे सध्या काम करत असून शिर्डी दर्शनासाठी गेले होते. तिन्ही युवक गुजरातमधील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रेल्वेतून पडल्याची अफवा की सत्य?
घटनेनंतर परिसरात तिघे युवक गाडीतून पडल्याची चर्चा पसरली होती. मात्र, लोको पायलटने स्वतः हे तिघे तरुण गाडीसमोर आल्याचे सांगितल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. रेल्वे प्रशासनाने हा जीवनयात्रा संपविण्याचाच प्रकार असून अपघात नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचा दावा केला आहे.