नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क | श्री कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानाचे मूल्यांकन करण्यात आले. शासकीय मान्यताप्राप्त मूल्यांकनकर्त्यांच्या माध्यमातून हे मूल्यांकन करण्यात आले आहे. श्री कपालेश्वर मंदिरातील पाच पैकी चार दानपेट्यांमध्ये भाविकांनी दिलेल्या दानाची विक्रमी वेळेत मोजणी करण्यात आली. या चारही पेट्यांमध्ये तब्बल 13 लाख 14 हजार 91 रुपयांचे दान भाविकांनी केले असल्याची माहिती संस्थानने दिली.
गुरव यांच्यात दानपेटीवरून झालेल्या भांडणानंतर पाच दानपेटी सील करण्यात आली. या सर्व दानपेट्या भाविकांनी दिलेल्या दानातून भरल्याने त्यांची मोजदात करण्यात आली. धर्मदाय आयोग यांनी मोजणीचे आदेश दिल्यानंतर चार दिवसात मोजणी पूर्ण झाली. या दानपेट्यांमधून कपालेश्चराला एकूण 13 लाख 14,091 रुपये इतकी रक्कम दानपेटीत जमा झाले आहेत.
संस्थानतर्फे मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या पाच दानपेट्यांपैकी केवळ दोन दानपेट्यांचा हिशेब दिला जात असल्याने भाविक देवेंद्र पाटील आणि राहुल बोरिचा यांनी धर्मादाय उपायुक्त कार्यालयात तक्रार अर्ज केला होता. त्यावेळी दानपेटीतील रकमेवरून हेमंत उर्फ पप्पू गाडे, अविनाश गाढे व इतरांमध्ये वाद झाल्याने धर्मादाय आयुक्तांनी सर्व दानपेटी सील करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दानपेट्या पूर्ण भरल्याने, दानपेट्यांचे सिल उघडून त्याची मोजणी केली जावी याबाबतचा अर्ज संस्थानचे अध्यक्ष ॲड. अक्षय कलंत्री यांनी धर्मदाय उपायुक्त कार्यालयात दिला हाेती. त्याची सुनावणी होऊन त्यावर सर्व दानपेट्यांचे सील उघडून निरीक्षक व्ही. बी. पाटील, एस. आर. हळदे, पी. जे. अत्तरदे यांच्यामार्फत पोलिस बंदोबस्तात दान रकमेची मोजणी करून सर्व दानपेट्यांचा स्वतंत्र हिशेब ठेवून संस्थानच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते.
धर्मदाय निरीक्षक यांच्यामार्फत पोलिस बंदोबस्तात अध्यक्ष ॲड. अक्षय कलंत्री, उपाध्यक्षा श्रद्धा कोतवाल, सचिव रावसाहेब कोशिरे, खजिनदार श्रीकांत राठी, विश्वस्त मंडलेश्वर काळे, ॲड. प्रशांत जाधव, सुनील पटेल, व्यवस्थापक सुनील शिनगाण, कर्मचारी गोकुळ शेवाळे आदींच्या उपस्थितीत दि. 13 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत एकूण चार दानपेट्यांची मोजणी करण्यात आली. चारही दानपेट्यांतील 13 लाख 14 हजार 91 रुपयांची रक्कम रोख स्वरूपात प्राप्त झाली आहे.
लहान स्टील दानपेटी (ट्रस्ट) : चार लाख ५५ हजार ४१० रुपये
मोठी स्टील दानपेटी : सहा लाख दोन हजार ११२ रुपये
लहान लोखंडी दानपेटी (ट्रस्ट) : दोन लाख ४७ हजार ५२१ रुपये
काशी विश्वनाथ मंदिर दानपेटी : नऊ हजार ४८ रुपये
पारावरील मारुती मंदिरातील दानपेटी ५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी 2 वाजता चाेरीला गेली असून, या दानपेटीचा अद्याप तपास लागला नाही. या प्रकरणी पोलिस चोरट्यांचा शोध घेत असल्याचे संस्थानतर्फे सांगण्यात आले आहे.
धर्मादाय उपायुक्तांच्या आदेशामुळे भाविकांना संपूर्ण दान रकमेचा हिशेब पारदर्शकपणे मिळणार आहे. यापूर्वीही नवीन विश्वस्त मंडळाने संस्थानच्या कारभाराची मांडणी पारदर्शकपणे केली होती. दरम्यानच्या काळात लक्षात आलेल्या काही गैरप्रकारावर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.ॲड. अक्षय कलंत्री, अध्यक्ष, श्री कपालेश्वर महादेव मंदिर संस्थान