जुने नाशिक: इस्लाम धर्माचे जेष्ठ धर्मगुरू हजरत शेख अब्दुल कादीर जीलानी अर्थात 'गौस ए पाक' यांच्या जयंतीनिमित्त जुने नाशिक परिसरात पारंपारिक जुलूस ए गौसिया मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. 'गौस का दामन नही छोडेंगे', नारे ए गौस, या गौस', नारे ए तकबीर अल्लाहो अकबर' असा जयघोष करत हजारो मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले.
गौस ए आजम जयंतीनिमित्त जुने नाशिक परिसरीतील मशिदी, दर्गे , मुस्लिम बहुल भागातील घरे व दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर मशिदींमध्ये खतमे काद्रीया नात-ए-पाकच्या मैफिली झाल्या, तर घराघरात कुरआनख्वानी करून फातेहा पठण करण्यात आले.
दुपारी तीन वाजता जुलूस-ए-गौसिया मिरवणुकीची सुरुवात शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली चौकमंडई येथून झाली. बजमे गरीब नवाझ चौक मंडईतर्फे शहर-ए-खतीब हिशामुद्दीन खतीब, मौलाना सय्यद शरीफ, मौलाना मेहबूब आलम, काझी एजाज आदी मान्यवरांचा सय्यद शौकत, सय्यद फिरोज, तबरेज शेख, ज़हूर अतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड हे यावेळी उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान शरबत व खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. या मिरवणुकीत नाशिकसह ओझर, नाशिकरोड, वडाळागाव, नागजी, सिडको, सातपूर आदी भागांतून हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले. मिरवणुक सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शांतता, समृद्धीसाठी दुवा पठण
बागवानपूरा, कथडा, शिवाजी चौक, पठाणपुरा, बुधवार पेठ, काजीपुरा, मुलतानपुरा, कोकणीपूरा, खडकाळी, शहीद अब्दुल हमिद चौकमार्गे पिजार घाट रोडवरील मोठ्या दर्ग्यावर पोहोचून मिरवणुकीची सांगता झाली. या ठिकाणी शहर-ए-खतीब यांनी देशाच्या शांतता व समृद्धीसाठी विशेष दुआ केली. तसेच शहीद अब्दुल चौक रिक्षा स्टँडतर्फे बडी दर्गा तर जहांगीर मस्जिद चौक मंडईत बजमे गरीब नवाझ कमिटीतर्फे अन्नदानाचे (नियाझ गौस) नियोजन करण्यात आले.
वडाळागावात जुलूसचा उत्साह
वडाळागाव परिसरात उत्साहात जुलूसे गौसिया काढण्यात आला. मिरवणुकीचे नेतृत्व गौसिया मशिदचे इमाम कारी जूनैद आलम यांनी केले. मदद फाउंडेशनने उभारलेली सैय्यद गौसे आझम यांच्या मजारची प्रतिकृती लक्षवेधक ठरली.