नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने नुकतेच जिंदाल स्टेनलेस स्टील समुहाचे मुख्य व्यवसाय अधिकारी शशीभूषण उपाध्यक्ष व विक्री, मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष विशाल शेठ यांची भेट घेवून, उत्तर महाराष्ट्रातील उद्योग विकासाच्या संधींबाबत चर्चा केली. यावेळी जिंदाल समुह उत्तर महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चेअंती समोर आल्याचे महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी सांगितले आहे.
सोनवणे म्हणाले, उत्तर महाराष्ट्रात असलेल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ याबाबतची विस्तृत माहिती जिंदालच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी जिंदालचे उपाध्याय यांनी समुहाकडून रायगड जिल्ह्यात ४५ हजार कोटीहून अधिकची गुंतवणूक केली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी सोनवणे यांनी उत्तर महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या मुबलक जागा, कुशल मनुष्यबळ, पाणी, वीज, उद्योगास पोषक पायाभूत सुविधा तसेच प्रस्तावित निफाड ड्रायपोर्ट, वाढवण बंदर, समृद्धी महामार्गद्वारे उपलब्ध आयात निर्यातीच्या संधी याचे सादरीकरण केले असता, उपाध्याय यांनी जिंदाल उत्तर महाराष्ट्रात गुंतवणूकीस उत्सुक असल्याचे सांगितले. चेंबरच्या मुंबई विभागाचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांनी महाराष्ट्र चेंबरबाबतची माहिती दिली. शिष्टमंडळात मासिआ बिझनेस नेटवर्किंग फोरमचे चॅप्टर हेड बाळासाहेब आमरे, सदस्य आनंद सूर्यवंशी उपस्थित होते.