नाशिक : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीवरून सध्या बैठकांना जोर आला असला तरी, नाशिकमध्ये मात्र दोन्ही सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जवळपास मनोमिलन झाल्याचे चित्र आहे. त्याचीच प्रचिती दर्शविण्यासाठी दोन्ही सेनेचे कार्यकर्ते शुक्रवार (दि.१२) रस्त्यावर उतरणार आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार, कथित हनीट्रॅप, अंमली पदार्थ, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या फसवणुकीविरोधात हा जनआक्रोश महामोर्चा असून, यात दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.
मागील एक महिन्यापासून दोन्ही सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून या जनआक्रोश मोर्चाची तयारी केली जात आहे. जिल्हाभरात मेळावे, सभा, बैठका घेवून नागरिकांना या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. दोन्ही सेनेचे पदाधिकारी संयुक्तपणे मेळावे, बैठकांना सामोरे जात असल्याने, नाशिकमध्ये दोन्ही सेनेचे मनोमिलन झाल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. या महामोर्चाच्या निमित्ताने दोन्ही सेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार असून, जिल्हावासियांशी निगडीत प्रश्नांवर हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
कथित हनीट्रॅप, अंमली पदार्थांचा सर्रास वापर, शेतकऱ्यांची फसवणूक, महापालिकेतील भ्रष्टाचार, अवैध धंदे व सावकारी, डिजिटल फसवणूक, स्मार्ट मीटर आणि खासगीकरण, महिला सुरक्षा, कामगारांवर अन्याय, बेरोजगारी, आदिवासींची पिळवणूक, प्रदूषित नद्या, प्रशासनातील भ्रष्टाचार, कंत्राटदारांचे आर्थिक शोषण, जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचार, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत भ्रष्टाचार, आयटी पार्कच्या नावे आश्वासनांची खैरात, राजकीय गुन्हेगारी, झोपडपट्टी पुनर्वसन आदी मुद्दे घेवून हा मोर्चा काढला जात आहे. शुक्रवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता बी. डी. भालेकर मैदान येथून मोर्चा काढण्यात येणार आहे.
ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत, आमदार सचिन आहेर, मनसे नेते बाळा नांंदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे हे नेते जनआक्रोश मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोर्चात माेठ्या संख्येनी नाशिककर सहभागी होतील, असा विश्वास दोन्ही सेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.