नाशिक : पाणी व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत सोमवारी (दि. 9) जिल्ह्यात जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण तसेच हातपंपांचे शुद्धीकरण करण्याच्या विशेष मोहिमेस सुरुवात झाली आहे.. दि. 9 ते 13 जून या कालावधीत ही मोहीम राबविली जाणार आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, अंगणवाड्या, शाळा, येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली. दरवर्षी जून महिन्यात जिल्ह्यात जलकुंभ स्वच्छता अभियान राबविण्यात येते. यासाठी प्रत्येक तालुक्याला वेळापत्रक तयार करून देण्यात आले असून, त्यानुसार तालुक्यांनी अंमलबजावणी करावयाची आहे. यामध्ये ग्रामपंचायती, अंगणवाड्या व शाळेत वापरात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे रिकाम्या करून त्यातील स्वच्छता करणे व ज्या स्रोताचे पाणी पिण्यास वापरले जाते, त्याचे क्लोरिनेशन आरोग्यसेवक, आरोग्य सहायक व जलसुरक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सलग सातव्या वर्षी हे अभियान राबविण्यात येत आहे.
गावातील पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनची (स्रोत ते शेवटच्या नळ जोडणीपर्यंत) तपासणी करून गळती असल्यास दुरुस्ती करून सुस्थितीत असल्याची खात्री करणे तसेच पूरग्रस्त गावांमधील वापरात असलेल्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे पुराच्या पाण्यामुळे बाधित होतात अशा वेळेस गावातील इतर स्रोतांचा वापर करणेकामी पूर्वनियोजन म्हणून त्याची स्वच्छता व तपासणी करून पाणीपुरवठा करण्यास उपयोगात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा तसेच तालुकास्तरावरून दैनंदिन स्वरूपात अभियानाचे संनियंत्रण करण्यात येणार आहे. अभियानासाठी सर्व संबंधित विभागांना व ग्रामस्तरावरील कर्मचा-यांना जबाबदारी देण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.
सर्व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करून, त्यावर शुद्धीकरण करण्याची तारीख ऑइलपेंटने नमूद करणे. पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात टीसीएल उपलब्ध राहील याबाबत दक्षता घ्यावी. सर्व ग्रामपंचायतींमध्ये एक दिवस कोरडा पाळावा. सर्व ग्रामपंचायतींमध्ये टीसीएल उपलब्ध असावे तसेच टीसीएल पावडरची तपासणी करावी. ज्या ग्रामपंचायत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, त्या टॅंकरचे पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय जनतेला देऊ नये.