उन्हाळ्याची अधिकृत सुरुवात व्हायची असतानाच जळगाव जिल्ह्यात तापमानाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अवघ्या तीन दिवसांत पारा ३२ अंशांवरून थेट ३६ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात सूर्याचा ‘रुद्रावतार’ पाहायला मिळत असून, यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
फेब्रुवारी अखेरीस वातावरण काहीसे सुसह्य होते. मात्र १ मार्चपासून तापमानाचा आलेख झपाट्याने वाढू लागला. १ मार्च रोजी कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर २ मार्चला ते ३३.६ अंशांवर गेले आणि ३ मार्च रोजी थेट ३६.५ अंशांपर्यंत पोहोचले. अवघ्या ७२ तासांत ४.२ अंशांची वाढ ही चिंताजनक मानली जात आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
तापमानवाढीबरोबरच हवेतील आर्द्रतेचे प्रमाण (Relative Humidity) ७० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान असल्याने उष्णतेची दाहकता अधिक जाणवत आहे. वाढत्या ‘आरएच’मुळे अंगाची लाहीलाही होत असून घामाच्या धारा लागल्या आहेत. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणा, कुलर, पंखे आणि थंड पेयांकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे.
१ मार्च
कमाल – ३२.३°C
किमान – १८.५°C
आर्द्रता – ७१%
२ मार्च
कमाल – ३३.६°C
किमान – १४.५°C
आर्द्रता – ८०%
३ मार्च
कमाल – ३६.५°C
किमान – १७.०°C
आर्द्रता – ७५%
दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. जणू काही ‘कर्फ्यू’सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तापमानातील अचानक वाढ आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
डॉक्टरांनी दिवसभरात भरपूर पाणी पिणे, शक्यतो दुपारी उन्हात जाणे टाळणे, हलके आणि सुती कपडे वापरणे तसेच डोक्यावर संरक्षण ठेवणे याबाबत सूचना केल्या आहेत. मार्चच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती असल्यास एप्रिल आणि मे महिन्यात तापमान ४५ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा जळगावकरांसाठी अधिक आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.