Bribery Case pudhari
नाशिक

Jalgaon PWD Engineer Bribery Case: लाचखोर अभियंत्यानं एसीबीला फोडला घाम... दोन परदेशवाऱ्या करणाऱ्या अहिरेंची मलमत्ताच मिळेना

Anirudha Sankpal

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

pwd engineer yogesh ahire bribery case: पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागातील शाखा अभियंता योगेश अहिरे याने जमवलेली 'काळी माया' शोधण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. ज्या अभियत्याने दोन वेळा परदेशवाऱ्या केल्या, त्याच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता सापडू नये, याबाबत आता आश्चर्य व्यक्त केले जात असून, एसीबीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, अटक होऊन ४८ तास उलटूनही अहिरे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अद्याप शासनाकडे का गेला नाही? यात कोणते 'रहस्य' दडले आहे, अशी चर्चा आता रंगली आहे.

मालमत्ता मिळाली नसल्याने आश्चर्य

शाखा अभियंता योगेश अहिरे याला पाच लाखांची लाच घेताना पकडल्यानंतर त्याच्या घराची आणि मालमत्तेची झडती घेणे अपेक्षित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अधिकारी आतापर्यंत दोन वेळा परदेश दौरा करून आला आहे. ज्या व्यक्तीची राहणीमान इतकी विलासी आहे आणि जो परदेशात फिरून येतो, त्याच्या नावावर काहीच मालमत्ता कशी काय असू शकत नाही? "माहिती मिळवत आहोत, शोध घेत आहोत," अशी गुळगुळीत उत्तरे एसीबी कडून मिळत असल्याने या तपासात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का? असा संशय बळावला आहे.

नियमानुसार तात्काळ निलंबन आवश्यक

नियमानुसार, कोणताही शासकीय कर्मचारी ४८ तासांपेक्षा जास्त वेळ पोलीस कोठडीत राहिल्यास त्याचे तात्काळ निलंबन होणे आवश्यक असते. योगेश अहिरे दोन दिवस पोलीस कोठडीत असतानाही त्यांचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अद्याप का पोहोचला नाही? अहवाल नसल्याचे कारण पुढे करून अधीक्षक अभियंता कार्यालयाने निलंबनाचा प्रस्ताव का रोखला आहे? ही दिरंगाई जाणीवपूर्वक केली जात असल्याचे बोलले जात आहे.

तो 'वरिष्ठ अधिकारी' कोण?

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार आणि तपासातील सुरुवातीच्या धाग्यादोऱ्यांनुसार, योगेश अहिरे याने ही पाच लाखांची लाच एका 'वरिष्ट अधिकाऱ्यासाठी' किंवा त्याच्या सांगण्यावरून मागितली होती. तो वरिष्ठ अधिकारी नेमका कोण? त्याच्यापर्यंत तपासाची चक्रे का पोहोचत नाहीत? केवळ कनिष्ठ अभियंत्याला बळी देऊन विभागातील 'मोठे मासे' नामानिराळे राहणार का? हा खरा कळीचा मुद्दा आहे.

काय म्हणतात अधीक्षक अभियंता?

या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रशासकीय नियमाकडे बोट दाखवले. "पोलीस विभागाकडून संबंधित अभियंता ४८ तासांहून अधिक काळ कोठडीत असल्याचा अधिकृत अहवाल आल्याशिवाय आम्ही शासनाकडे निलंबनाचा प्रस्ताव पाठवू शकत नाही. अहवाल प्राप्त होताच तात्काळ पुढील कारवाई केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत अँटी करप्शन विभागाचे डी वाय एस पी योगेश ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही संबंधित व्यक्तीच्या माहिती घेत आहोत. संबंधित व्यक्ती हा दोन वेळा विदेशवारी करून आल्याचे माहिती आहे असे त्यांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT