नाशिक

Jalgaon Municipal Corporation Election Result 2026: 'पारदर्शक' कारभाराला 'खाकी' पहारा; पत्रकारांना प्रवेशद्वारावरच रोखले

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: आयोगाच्या नियमांचे कारण पुढे करत आयुक्तांची मनमानी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकतेला हरताळ फासण्याचा प्रकार आज (दि.१६ जानेवारी) जळगावात घडला. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान महापालिका आयुक्त ढेरे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांवर बोट ठेवत चक्क पत्रकारांना आणि छायाचित्रकारांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश नाकारला. 'लोकशाहीच्या चौथ्या स्तंभा'लाच वेशीवर रोखण्याच्या या 'मुजोर' प्रकारामुळे पत्रकारांनी संताप व्यक्त करत ठिय्या मांडला. अखेर पत्रकारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाला नमते घ्यावे लागले.

शहरातील एमआयडीसी भागातील वखार महामंडळाच्या गोदामात आज (दि. १०) सकाळी १० वाजता टपाल मतदानाने मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र, निकाल कव्हर करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना आणि छायाचित्रकारांना मुख्य प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. "आत कोणालाही प्रवेश नाही, खुद्द महापालिका आयुक्त ढेरे आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांनी (PRO) पत्रकारांची बोळवण केली.

आयुक्तांचा 'फत्वा' आणि पोलिसांची अरेरावी

मतमोजणीच्या वेळी नेहमीच निवडणूक आयोगाच्या अधिकृत पासधारक पत्रकारांना मीडिया कक्षात किंवा जाळीच्या बाहेरून वृत्तांकन करण्यास मुभा असते. मात्र, आज आयुक्तांनी मनमानी कारभार करत कुणालाही प्रवेश न देण्याचा हेका धरला. पत्रकारांनी आयुक्तांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी "आम्ही कोणालाही परवानगी देणार नाही," असे सागितले आत काय चालले आहे, हे बाहेर येऊ नये यासाठी प्रशासनाचा हा खटाटोप कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आंदोलनानंतर प्रशासनाचे नाक घासले

प्रशासनाच्या या दडपशाहीविरोधात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेत तेथेच आंदोलन सुरु केले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून प्रशासनाला अखेर जाग आली. त्यानंतर वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांना कॅमेरा घेऊन आत जाण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, तरीही तेथील पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी छायाचित्रकारांच्या कामात अडथळे आणत आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केलाच.

निवडणूक आयोगाचे नियम नेमके कोणासाठी?

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असते. मतमोजणी केंद्रात अधिकृत माध्यम प्रतिनिधींना प्रवेश देणे हे आयोगाच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. केवळ मोबाईल नेण्यास बंदी असते, मात्र अधिकृत कॅमेरे मज्जाव करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. जळगाव प्रशासनाने आज नियमांचा चुकीचा अर्थ लावून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला, याची चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT