जळगाव : पुढारी वृत्तसेवा
सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करत असताना, याच योजनेच्या नावाखाली महिलांची अडवणूक करून त्यांच्या असहायतेचा फायदा घेणारे नराधम समाजात वावरत आहेत.
जळगावमध्ये एका नराधमाने योजनेचे केवायसी करून देण्याच्या बहाण्याने विवाहित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला (३५) या गेंदालाल मिल परिसरात राहतात.
त्यांचे पती गोलाणी मार्केटमध्ये काम करतात. संशयित आरोपी गोकुळ चव्हाण हा पीडितेच्या पतीचा मित्र असल्याने त्याचे घरी येणे-जाणे होते. फिर्यादी महिलेला लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे मिळाले नसल्याने त्यांना केवायसी करायचे होते. पतीचा मित्र असल्याने त्यांनी गोकुळवर विश्वास टाकला. पण याच विश्वासाला त्याने तडा दिला.