जळगाव : पुढारी वृत्तसेवा – चोपडा तालुक्यातील गुळ मध्यम प्रकल्पाच्या साठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या 16 वर्षापासून मोबदला मिळवण्यासाठी तापी महामंडळाच्या कार्यालयाच्या अनेक फेऱ्या मारल्या त्यांना अजूनही त्यांचा मोबदला मिळाला नाही. तापी महामंडळाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या केबिन बाहेर झोपा काढा आंदोलन करून त्यांनी शासनाला व तापी महामंडळाला जाग येण्यासाठी व त्यांना जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी अनोखे आंदोलन केले.
चोपडा तालुक्यामध्ये तापी महामंडळ अंतर्गत गुळ मध्यम प्रकल्पासाठी 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करण्यात आलेली होती. या शेतकऱ्यांचे शासनाकडे तेवीस कोटी रुपये घेणे होते. त्यापैकी तीन कोटी 50 लाख रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेले आहे. 20 कोटी 94 लाख रुपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. मात्र निधी आला नाही निधी मागणी केलेली आहे असे विविध कारणे सांगून आज पर्यंत गेल्या 16 वर्षापासून तापी महा मंडळ कडून शेतकऱ्यांना त्यांचा शेत जमिनीचा मोबदला मिळालेला नाहीये. यासाठी शेतकरी संघटना व शेतकरी यांनी सात नोव्हेंबर रोजी निवेदन दिले होते की, 21 नोव्हेंबर पर्यंत मोबदला मिळावा.. मोबदला न मिळाल्याने शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी तापी महामंडळाच्या कार्यालयात अकरा वाजेपासून झोपा काढा आंदोलन सुरू केलेले आहेत.
गुळ मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी तापी महामंडळाच्या कार्यालयातून शेतकरी संघटनाच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गुळ मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील शेतकऱ्यांवर रागवून म्हणाले, दुरून बोल. त्यानंतर शेतकऱ्यांनी तापी महामंडळाच्या कार्यालया बाहेर गोधड्या टाकून झोपा काढा आंदोलन सुरू केले. यात शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, शेतकरी हेमंत सुरणा, सुवर्णसिंग राजपूत, अशोक माळी, प्रवीण पाटील, भागवत पाटील, धनगर बाळू पाटील व अन्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.