नाशिक : विकास गामणे
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशन योजना अंमलबजावणीत एकूण मंजूर कामांच्या 65.38 टक्क्यांपेक्षा अधिक कामे करून राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये आघाडी घेतली आहे. नाशिक जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या 1 हजार 222 योजनांपैकी 800 योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण करत राज्यात प्रथमस्थानी आहे. नाशिक पाठोपाठ अमरावती जिल्हा परिषद दुसऱ्या, तर छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या स्थानी आहे.
जलजीवन मिशन योजनांच्या झालेल्या राज्यस्तरावरील आढावा बैठकीतून ही माहिती समोर आली. प्रत्येक घराला नळाने शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे ध्येय समोर ठेवून केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजनेची घोषणा केली होती. केंद्र व राज्य सरकारच्या निधीमधून जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत 26 हजार 784 कोटी रुपयांच्या निधीतून 33 हजार 818 योजनांना राज्यात मंजुरी आहे. यात नाशिक जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने 1 हजार 222 पैकी 800 योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण केले आहेत. त्यातील 733 योजनांमधून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. गत वर्षभरापासून वेळोवेळी झालेल्या आढाव्यात नाशिक जि.प.ने योजना अंमलबजावणीत आघाडी घेतली आहे. 15 एप्रिल 2024 रोजी झालेल्या बैठकीत सर्वाधिक 613 योजना पूर्ण करत जि.प. राज्यात पहिल्या क्रमांकावर होती. या योजना पूर्ण करण्यासाठी शासनाने 31 मार्च 2024 ची डेडलाइन दिली होती. मात्र, लोकसभा निवडणूक, दुष्काळामुळे ही डेडलाइन 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविली होती. यातच राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्याने ही मुदत आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढविलेली आहे. सद्यस्थितीत 800 योजना पूर्ण झाल्या असून 120 ते 140 योजनांची कामे ही 70 ते 80 टक्के पूर्ण झालेली आहेत, तर 80-100 योजनांची कामे ही 50 टक्क्यांहून अधिक झालेली आहेत.
जिल्हा- मंजूर योजना- टक्केवारी
नाशिक- 1222- 800- 65.38
अमरावती- 661- 432- 65.36
संभाजीनगर 1145- 631- 55.11
भंडारा- 692- 363- 52.46क्के
सांगली- 683- 342- 50.07
चंद्रपूर- 1283- 610- 47.54
सातारा- 1347 - 638- 47.36
रायगड- 1422- 647- 45.05
धाराशिव- 570- 238- 41.75
गोंदिया- 1031- 403- 39.09
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी बैठका घेऊन, योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. त्यानुसार पाठपुरावा करत योजना पूर्ण केल्या जात आहेत. सर्व योजना डेडलाइनपूर्व पूर्ण करण्यासाठी प्रयत्न असणार आहे.- गंगाधर निवडंगे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि. प. नाशिक