Jaipur Flight Service : जयपूर विमानसेवा पूर्ववत; दिल्लीसाठी आणखी एक फ्लाइट Pudhari File Photo
नाशिक

Jaipur Flight Service : जयपूर विमानसेवा पूर्ववत; दिल्लीसाठी आणखी एक फ्लाइट

विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याने व्यापार आणि उद्योग क्षेत्राला मोठा फायदा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक हवाई मार्ग विकसित होत आहे. काही महिन्यांपूर्वी बंद पडलेली नाशिक-इंदूर-जयपूर विमानसेवा पुन्हा सुरू होत असून, हैदराबाद आणि नवी दिल्लीसाठीही अतिरिक्त फ्लाइट सुरू होणार आहेत. या सेवा २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्यामुळे व्यापार आणि उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

नाशिकमधून सध्या इंडिगो एअरलाइन्स कंपनीकडून सेवा दिली जात आहे. दिल्ली, गोवा, हैदराबाद, अहमदाबाद, बेंगळुरू या शहरांना सध्या फ्लाइट सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक-जयपूर विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, काही कारणांमुळे ती बंद पडली. याशिवाय इंदूर सेवाही बंद पडली होती. आता पुन्हा जयपूर व्हाया इंदूर ही सेवा सुूूरू होत आहे. नाशिक-इंदूर-जयपूर ही सेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे. तसेच नाशिक-दिल्लीसाठी दुसरी फ्लाइट मिळणार असल्याने, नाशिकहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. दरम्यान, २६ ऑक्टोबरपासून या सेवा सुरू होणार असल्या तरी, अद्यापपर्यंत याबाबतचे कुठलेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाहीत.

1 नोव्हेंबरपासून सेवा

सदर विमानसेवा २६ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर राेजी सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या नाशिक - हैदराबाद ही सेवा सात दिवसांसाठी आहे. आता कंपनीने अतिरिक्त नाशिक-हैदराबाद ही विमानसेवा सुरू केली असली तरी, ती आठवड्यातून तीनच दिवस असेल, असे ‘निमा’च्या एव्हीएशन कमिटीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी स्पष्ट केले आहे.

चार ‘इअरलासन्स’ची हमी; आता राजकीय इच्छाशक्ती हवी

वर्षाअखेरपर्यंत सेवा सुरू करण्याची तयारी : पत्रव्यवहार, बैठकांअंती आश्वासन

नाशिक : सतीश डोंगरे

सन २०१२ पासून नाशिकहून सुरू झालेल्या विमानसेवेचा प्रवास चढउताराचा राहिला. ‘उड्डाण’अंतर्गत सुरू झालेल्या नाशिकच्या विमानसेवेने प्रारंभी ‘टेक ऑफ’ घेतले होते. एक, दोन नव्हे तर तब्बल सहा कंपन्यांनी नाशिकहून विमानसेवा सुरू केली. मात्र, २०२२ पर्यंत या कंपन्यांंनी अचानक सेवा बंद केली. त्यामुळे एक काळ असाही होता की, नाशिकहून एकाही कंपनीची सेवा नव्हती. अशात २०२३ मध्ये ‘इंडिगो’ कंपनीने एण्ट्री करीत, नाशिकच्या विमानसेवेला भरारी दिली. आता आणखी चार एअरलाइन्स नाशिकहून विमानसेवा सुरू करण्यास उत्सुक आहेत. वर्षाअखेरपर्यंत त्या स्पर्धेत येण्याची शक्यता असली तरी अर्थात प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याने, नेत्यांनी आतातरी आपले राजकीय वजन वापरावे, अशी मागणी व्यापार-उद्योग क्षेत्रातून केली जात आहे.

२०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकची हवाई कनेक्टिव्हिटी प्रकर्षाने समोर येणार आहे. त्यामुळे आतापासून नाशिकच्या विमानसेवेला बळकट करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. दुर्देवाने होत नसल्याने, नाशिक विमानसेवेचे पंख वारंवार छाटले गेले आहेत. सध्या नाशिक विमानतळावरून इंडिगो कंपनीकडून हैदराबाद, अहमदाबाद, गोवा, दिल्ली, बंगळुरू या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू असून, त्यास उदंड असा प्रतिसाद आहे. आगामी सिंहस्थात देशातील इतर महत्त्वाच्या शहरांना जोडणारी सेवा नाशिकहून सुरू होणे गरजेचे असून, त्याकरिता नव्या एअरलाइन्स कंपन्यांची गरज आहे. त्यादृष्टीने औद्योगिक संघटनांकडून चार नव्या कंपन्यांशी पत्रव्यवहार तसेच बैठका घेऊन त्यांना नाशिकमध्ये येण्यास आमंत्रित केले असता, त्यांच्याकडून सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. वर्षाअखेरपर्यंत नाशिकहून सेवा सुरू करण्याची या कंपन्यांनी हमी दिल्याने, राजकीय इच्छाशक्ती वापरून या कंपन्यांना नाशिकमध्ये आणण्यासाठी आता पुरेसे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.

सीईओ अधिकाऱ्यांसमवेत बैठका

आकाशा, स्टार एअर, एअर इंडिया एक्सप्रेस, फ्लाय ९१ या आघाडीच्या कंपन्यांसमवेत औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून दोन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याशिवाय कंपन्यांच्या सीईओ स्तरीय अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेण्यात आल्या आहेत. या कंपन्यांकडून एअरक्राफ्टचा तुटवडा असल्याचे कारण दिले असले तरी, वर्षाअखेरपर्यंत नाशिकहून सेवा सुरू करण्यास ही सकारात्मकता दर्शविली आहे.

चारपैकी दोनच मंत्री प्रयत्नशील

नाशिक विमानसेवेचा विस्तार होण्यासाठी नव्या एअरलाईन्स कंपन्या याव्यात, यासाठी जिल्ह्यातील चार मंत्र्यांपैकी फक्त दोन मंत्री काहीसे प्रयत्नशील आहेत. त्यापैकी एका मंत्र्याने कंपन्यांशी थेट पत्रव्यवहार केला असून दुसरे फक्त आश्वासन देत आहेत. उर्वरित दोघांना या विषयाची विशेष माहिती नसल्याचे बोलले जात आहे.

आकाशा, स्टार एअर, एअर इंडिया एक्सप्रेस, फ्लाय ९१ या कंपन्यांशी पत्रव्यवहार तसेच कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या आहेत. वर्षाअखेरपर्यंत नाशिकमध्ये सेवा करण्यात ते उत्सुक आहेत. राजकीय पातळीवर प्रयत्न झाल्यास, या कंपन्या नाशिकमध्ये येऊ शकतात.
मनीष रावल, उपाध्यक्ष, निमा.

या शहरांमध्ये सेवा

  • आकाशा : मुंबई, पुणे

  • स्टार एअर : बेळगाव, गोवा (सोलापूर, मुंबई दृष्टीपथात)

  • फ्लाय ९१ : गोवा

  • एअर इंडिया एक्स्प्रेस : मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व इतर

नाशिकमधून बंद पडलेल्या विमानसेवा

  • एअर : डेक्कन मुंबई - २०१७

  • जेट : एअरवेज दिल्ली - २०१८

  • एअर अलायन्स : हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, बेळगाव - २०१९

  • टू जेट : अहमदाबाद - २०२०

  • स्टार एअर : बेळगाव - २०२०

  • स्पाइसजेट : दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद - २०२३

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT