एसआयपी गुंतवणूक Pudhari File Photo
नाशिक

बातमी गुंतवणुकीची ! बाजार कोसळूनही एसआयपी सुसाट, वेध 30 हजार कोटींचे

Nashik Investment News : एसआयपीबरोबर गुंतवणूकदारांकडून एसडब्ल्यूपी, एसटीपी योजनांचा वाढता वापर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक: असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (ॲम्फी) च्या आकडेवारीनुसार जून २०२५ मध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) व्दारे भारतात म्युच्युअल फंड गुंतवणुकीने २७,२६९ कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. बाजारात अनिश्चितता असली तरी दिवाळीपर्यंत एसआयपीची रक्कम तीस हजार कोटींना स्पर्श करेल, असा अंदाज विविध फंडांच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. आगामी तीन महिन्यात नवीन २५ ते ३० नवीन फंड योजना बाजारात येत आहेत.

मे महिन्यातील २६,६८८ कोटी रुपयांच्या एसआयपीत जूनमध्ये २ टक्यांनी वाढ झाली आहे. पहिल्यांदाच एसआयपीच्या गुंतवणूकीने २७,००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. योगदान देणाऱ्या एसआयपी खात्यांची संख्याही पहिल्यांदाच ८.६४ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. त्यातून गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग आणि म्युच्युअल फंडांवरील विश्वास अधोरेखित झाला आहे.

याव्यतिरिक्त, जूनमध्ये म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण निधी (एयूएम) ७४.१४ लाख कोटींवर पोहोचला असून विविध प्रकारच्या फंडांमध्ये तरुण पिढीचा व्यापक सहभाग दिसून येत आहे. एसआयपीला तरुणाई तसेच महिला गुंतवणूकदारांचा सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्लूपी) आणि सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी) वाढता सहभाग दिसत असल्याचे ॲम्फीच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एसआयपीमुळे भारतीय शेअरबाजाराला गेल्या दोन वर्षात स्थिरता मिळाली आहे.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय

  1. एसआयपी म्हणजे ठरावीक वेळेला (बहुतेक वेळा महिन्याला) एक ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची पद्धत.

  2. ही पद्धत सातत्य आणि शिस्त या दोन तत्त्वांवर आधारित आहे. गुंतवणूकीचा प्रारंभ अगदी लहान रकमेपासूनही सुरू करता येतं. कालांतराने 'रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग' आणि 'कंपाऊंडिंग' यांचा फायदा होतो आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण होते.

  3. एसआयपी ही पद्धत पगारदार व्यक्तींसाठी योग्य आहे. ते निवृत्ती, मुलांचं शिक्षण, घर खरेदी यांसारख्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी निधी तयार करू शकतात.

सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅनची वैशिष्ट्ये

  1. एसडब्ल्यूपी म्हणजे म्युच्युअल फंडातून ठरावीक वेळेला (महिन्याला, तिमाही किंवा वार्षिक) ठरावीक रक्कम परत काढता येते.

  2. निवृत्तीनंतरच्या टप्प्यात ही योजना खूप उपयोगी ठरते. नियमित उत्पन्न बंद होतं आणि खर्च चालवण्यासाठी उत्पन्नाची गरज असते अशा वेळी एकदम संपूर्ण गुंतवणूक काढण्याऐवजी, एसडब्लूपीव्दारे तुम्ही गुंतवणूक सुरू ठेवता आणि त्यातून ठराविक कालावधीत पैसे मिळवत राहतात.

  3. करसवलत हा या योजनेचा महत्त्वाचा फायदा आहे. दीर्घकालीन इक्विटी गुंतवणुकीतून पैसे काढताना, पारंपरिक व्याजाच्या उत्पन्नाच्या तुलनेत कराचा बोजा कमी असतो.

सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनची वैशिष्ट्ये

  1. एसटीपी म्हणजे एक फंडातून दुसऱ्या फंडात नियमितपणे पैसे ट्रान्सफर करण्याची योजना आहे. साधारणतः कमी जोखमीच्या डेट फंडातून जास्त वाढीच्या शक्यता असलेल्या इक्विटी फंडात निधी गुंतविता येतो.

  2. एसटीपी मुख्यतः मोठी रक्कम एकदम इक्विटी मार्केटमध्ये टाकायची नसते, अशा वेळी वापरता येते. बाजाराची अनिश्चिततेमुळे ही रक्कम प्रथम डेट फंडात ठेवली जाते आणि हळूहळू इक्विटीमध्ये ट्रान्सफर केली जाते.

  3. ही योजना धोका कमी करत, बाजाराची वेळ पकडण्याचा प्रयत्न न करता, शहाणपणानं गुंतवणूक करण्याची संधी देते.

म्युच्युअल फंडांचे जग गुंतागुंतीचे नाही. एसआयपी, एसडब्लूपी आणि एसटीपी हे शब्द अवघड अजिबात नसून विवेकपुर्ण गुंतवणूकीचे अत्यावश्यक आधारस्तंभ आहेत. ते नीट समजून घेतल्यास पैशावर आणि आर्थिक भविष्यावर अधिकाधिक नियंत्रण ठेवता येईल. बाजारातील ट्रेंडच्या मागे धावणे नव्हे, तर स्वतःसाठी योग्य योजना आखणे हेच महत्त्वाचे आहे.
अल्पा शाह, सीडब्लूएम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT