येवला ( नाशिक ) : नगराध्यक्ष पदाचा निर्णय मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते घेतला जाईल. येवला शहराच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार भुजबळ यांनी संपर्क कार्यालयात येवला नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नगर परिषद निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभाध्यक्ष वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, उपाध्यक्ष दत्ता निकम, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दीपक लोणारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार भुजबळ यांनी शहरातील १३ प्रभागांत इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. इच्छुक उमेदवारांकडून शहर विकासाच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण कल्पना, उपक्रम आणि योजना जाणून घेण्यात आल्या. बैठकीदरम्यान येवल्याच्या विकासासाठी योग्य त्या उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली.
१० प्रभागांच्या अंतिम मतदारयाद्या जाहीर; ९,६७६ पुरुष व ९,७०१ महिला मतदारांचा समावेश
चांदवड : नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयाद्या नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या. शहरातील १० प्रभागांमध्ये एकूण १९ हजार ३७७ मतदार असून, त्यापैकी ९ हजार ६७६ पुरुष व ९ हजार ७०१ महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी दिली. प्रभाग ९ मध्ये सर्वाधिक २,४२६ मतदार, तर प्रभाग 1 मध्ये सर्वात कमी १,५८९ मतदार नोंदवले गेले आहेत.
पूर्वी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयाद्यांवर दि. ८ ते १७ ऑक्टोबर दरम्यान नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. या कालावधीत एकूण ७९४ हरकती नगर परिषदेच्या कार्यालयात प्राप्त झाल्या. त्या सर्वांची तपासणी दि. १७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आली. बहुतांश हरकती या “निवास एका प्रभागात असून नाव दुसऱ्या प्रभागात” अशा स्वरूपाच्या होत्या. नगर परिषदेच्या पाच पथकांनी स्थळ परीक्षण करून पडताळणी केली. त्यातून सुमारे ७० टक्के हरकती मान्य करण्यात आल्या असून, योग्य त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दुबार नावे असलेल्या २०६ मतदारांची यादी निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही यादी नगर परिषदेच्या नोटीस बोर्डवरही प्रसिद्ध करण्यात येणार असून, सोमवारपासून या मतदारांची पडताळणी सुरू होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सिनारे यांनी दिली.
प्रभागनिहाय मतदारसंख्या :
प्रभाग १ : १,५८९ (पुरुष ७९१, महिला ७९८)
प्रभाग २ : १,८०३ (पुरुष ९०१, महिला ९०२)
प्रभाग ३ : २,०६० (पुरुष १,०३३, महिला १,०२७)
प्रभाग ४ : २,००६ (पुरुष ९८५, महिला १,०२१)
प्रभाग ५ : १,६३० (पुरुष ८०५, महिला ८२५)
प्रभाग ६ : २,०७० (पुरुष १,०४१, महिला १,०२९)
प्रभाग ७ : १,९३२ (पुरुष १,०००, महिला ९३२)
प्रभाग ८ : २,२५६ (पुरुष १,१३३, महिला १,१२३)
प्रभाग ९ : २,४२६ (पुरुष १,१७०, महिला १,२५६)
प्रभाग १० : १,६०५ (पुरुष ८१७, महिला ७८८)
एकूण मतदारसंख्या – १९,३७७ (पुरुष ९,६७६, महिला ९,७०१)