नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत उत्तर प्रदेशातील दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे २४ लाख ४३ हजार रुपये किमतीचे १६३ ग्रॅम ६६ मिलिग्राम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
जावेद अब्दुल गफ्फार (४०, रा. बी-२४, जिल्हा बिजनौर, उत्तर प्रदेश) आणि अरुणकुमार प्रेमदत्त शर्मा (५६, रा. तहसील धामपूर, जिल्हा बिजनौर, उत्तर प्रदेश) ही ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने चोरीच्या घटनांचा तपास सुरू केला होता. मंगळवारी (दि. १३) अमलदार आप्पा पानवळ आणि गोरख साबळे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांना बसस्थानक परिसरात चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला.
दहा घरफोडींची उकल
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात, पंचवटी हद्दीत एक आणि मुंबई नाका हद्दीत दोन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित पोलिस ठाण्यामधील अभिलेख तपासल्यानंतर हे दहा गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमिज शेख, राम शिंदे, कैलास चव्हाण, योगिराज गायकवाड तसेच गुन्हे शाखा युनिट एकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.