Tajiya Muharram
मोहर्रमचा सणानिमित्त मालेगावी २०७ ताबूतांची स्थापना करण्यात आली आहे. pudhari news network
नाशिक

Tajiya Muharram Nashik | 'मोहर्रम'निमित्त मालेगावी २०७ ताबुतांची स्थापना

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : शहर व परिसरात शिया व सुन्नी पंथीयांकडून बुधवारी (दि. १७) मोहर्रमचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांच्या स्मृतीनिमित्त मोहर्रमचा सण साजरा करण्यात येतो.

मोहर्रमचा सणाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १७) २०७ ताबूतांची स्थापना केली जाईल. मालेगाव शहरात ३५ सवारी, तीन आलमपंजा, नऊ शेरबाग असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मोहर्रमच्या दिवशी नमाजपठण करुन दुवा-ए-आशुरातून हजरत इमाम हुसैन यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे. गुरुवारी (दि. १८) मिरवणूक काढत ताबुतांचे विविधत विसर्जन होईल.

इस्लामिक नवीन वर्षाची सुरवात म्हणजे मोहर्रमच्या १ तारखेपासून मजलिसपठणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मशिदीमधून मजलिसद्वारे इमाम हुसैन यांच्या करबला युद्धातील बलिदानाची माहिती प्रवचन स्वरूपात दिली जात आहे. मोहर्रमच्या दिवशी बुधवारी उपवास करत नमाज व दुवा आशुराचे पठण केले जाणार आहे. करबला युद्धात शहीद झालेल्या इमाम हसन हुसैन व त्यांच्या कुटुंबीयांना आदरांजली वाहून शोक व्यक्त केला जाईल. गुरुवारी ताबूत विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने मनपा प्रशासनाने मिरवणूक मार्गांची स्वच्छता करून अडथळे हटविण्याची कारवाई हाती घेतली आहे. मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नवीन ताजियाघराचे लोकार्पण

शहरातील गिरणा-मोसम संगमाजवळ बफातीपुरा भागात इमाम हुसैन ईदगाह परिसरात नवीन ताजियाघरची उभारणी करण्यात आली आहे. या कामासाठी महापालिकेने ४० लाख रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला होता. रविवारी दुपारी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या हस्ते ताजियाघराचे लोकार्पण करण्यात आले. शहरातील सर्व ताजिया व ताबूत शांत करण्यासाठी येथे ठेवले जातील, याप्रसंगी सहायक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, प्रांताधिकारी नितीन सदगीर, उपअधीक्षक सूरज गुंजाळ, शफिक राणा आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT