नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या रस्त्यांवर विकासकामांच्या नावाखाली मृत्यूचा सापळा उभा राहत आहे का? कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या त्र्यंबकेश्वर रोडच्या कामाने आता आणखी एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला.
रस्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेच्या डोळ्यांसमोर महिनाभरापूर्वी चारचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या भाजीविक्रेते दिलीप दामोदर काळे (५५) यांनी बुधवारी (दि. १२) रात्री उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
रस्त्याच्या कामाशी संबंधित अपघातांत सातपूर भागातून तीन बळी गेल्यानंतरही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पाढा संपलेला नाही. नागरिकांच्या जीवाची किंमत केवळ कंत्राटी कामांच्या घाईपेक्षा कमी आहे का, असा संतप्त सवाल आता सातपूरकरांकडून उपस्थित होत आहे.
सातपूर राजवाडा परिसरात त्र्यंबकेश्वर रोडचे काम सुरू असताना गेल्या २० जुलै रोजी सायंकाळी दिलीप काळे रस्ता ओलांडत असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
गेल्या महिनाभरापासून कुटुंबीय आणि नातेवाईक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट पाहत होते. मात्र बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान यापूर्वी प्रभाकर निकम आणि प्रवीण गायकवाड या दोन कर्त्या पुरुषांचा रस्त्याच्या कामांशी संबंधित अपघातांमध्ये मृत्यू झाल्यानंतर आता दिलीप काळे यांचा मृत्यू झाला आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना, योग्य बॅरिकेटिंग, दिशादर्शक फलक आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली होती का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दिलीप काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
दिलीप काळे यांच्या अपघातानंतर स्थानिक नगरसेविका सविता काळे यांनी मनपा प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरत मागील प्रभागात ठिय्या आंदोलन केले होते. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, दिलीप काळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, तसेच या अपघाताची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका काळे यांनी केली आहे.