नाशिक : रोजगार क्षमतेत वाढ आणि उद्योग, शिक्षण यांच्यातील समन्वय मजबूत करण्यावर भर देण्याबाबतचा निर्णय एकमताने घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यश इन सभागृहात शिक्षण कौशल्य समन्वय उपक्रमाअंतर्गत निमा व लघु उद्योग भारती यांच्यात शुक्रवारी (दि.५) संयुक्त बैठक पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. व्यासपीठावर निमा अध्यक्ष आशिष नहार, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापक मंडळ सदस्य प्रा. डॉ. डी. एम. गुजराथी तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक प्रा. सुरेंद्र पाटोळे उपस्थित होते. शिक्षणक्रम अधिक रोजगाराभिमुख करण्यासाठी प्रत्यक्ष उद्योग कामकाजावर आधारित प्रात्यक्षिके, छोटे कॅप्सूल अभ्यासक्रम, हस्तपुस्तिका, लिंक-आधारित शिक्षण सामग्री व दृकश्राव्य व्हिडिओ तयार करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. उद्योग क्षेत्रातील अद्ययावत गरजांनुसार संशोधन आणि विकासासाठी विद्यापीठ दोन वर्षांचे अल्पमुदतीचे प्रकल्प सुरू करण्यास सहयोग देण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले.
लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तपाडिया यांनी जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि गोदावरी स्वच्छता मोहीमेवर भर दिला. तसेच ईव्ही तंत्रज्ञान प्रसारासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रा. सुरेंद्र पाटोळे यांनी कौशल्य विकासासाठी क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्र, ई-गॅरेज, अल्पकालीन व कॅप्सूल कोर्सेस, तसेच सायबर सुरक्षा, हेल्थकेअर, इलेक्ट्रिकल अशा क्षेत्रांत नवे अभ्यासक्रम विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप व स्टायपेंड मॉडेल सुचविण्यात आले. स्नेहल म्हापणकर यांनी मशरूम, नर्सरी, कृषी प्रोटोटाइप यांसारख्या स्वयंरोजगार संधी, तसेच स्टार्टअप व उष्मायन केंद्रांमुळे तरुणांना मिळणाऱ्या संधींवर प्रकाश टाकला.
बैठकीत रोजगाराभिमुख शिक्षणक्रम, उद्योगनिष्ठ प्रात्यक्षिके, कॅप्सूल अभ्यासक्रम, तसेच संशोधन व अल्पमुदतीचे प्रकल्प राबवण्यासाठी विद्यापीठाची तयारी असल्याचे कुलगुरू संजीव सोनवणे यांनी सांगितले. नाशिकच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी उद्योग–शैक्षणिक सहकार्याची ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. बैठकीस सुरेंद्र पाटोळे, प्रा. डी. एम. गुजराथी , प्रा. प्रशांत टोपे, नामकर्ण आवारे, राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत, कैलास पाटील, सचिन कांकरेज, नितीन आव्हाड, श्रीकांत पाटील, नानासाहेब देवरे आदी उपस्थित होते.
नाशिक गुंतवणूकीचे प्रमुख केंद्र
निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी, नाशिकच्या औद्योगिक विकासावर माहिती देत महिंद्रा अँड महिंद्रा प्रकल्पाची गुंतवणूक, सीपीआरआय लॅब उद्घाटन, ड्राय पोर्ट प्रकल्पाची अंमलबजावणी आणि डिफेन्स इनोव्हेशन सेंटरसाठी नाशिकची निवड ही महत्त्वाची पावले असल्याचे सांगितले. नाशिकला औद्योगिक गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.