नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हैद्राबाद गॅझेट आणि सरसगट बाबत स्पष्ट बोलले आहेत. मराठा आणि ओबीसी उपसमिती देखील केली असून ओबीसी उपसमितीत भुजबळांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणावर काय भूमिका घ्यावी हा सर्वस्वी भुजबळ यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
नाशिक सार्वजनिक वाचनालयात शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी गुरुवारी (दि. ११) शहरात आले असता त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आरक्षणाबाबत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, ही सरकारची भूमिका असल्याचे सांगून मंत्री सामंत म्हणाले, सरकारवर कोणताही दबाव आणून काहीही साध्य होणार नाही. ओबीसी उपसमितीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भुजबळ यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊ शकते. विखे-पाटील यामध्ये नक्किच मार्ग काढतील असा दावा त्यांनी व्यक्त केला.
नेपाळ आराजकतेबाबत समाजमाध्यमांवर वक्तव्य करताना किरण माने यांच्या वादग्रस्त भूमिकेबद्दल तक्रार दाखल झाली या प्रश्नांवर विचारले असता सामंत म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे शत्रु असल्यासारखे त्यांना वाटते. ज्यांना अशा पोस्ट टाकायच्या त्यांना शुभेच्छा असल्याचे सांगून सामंत यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.
कर्नाटक सरकारने तेथील एका भागाला असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. बोलताना मंत्री सांमत म्हणाले, कर्नाटकमध्ये कॉंग्रेसची छत्रपती शिवरायांबद्दल काय विचार आहे हे यातून दिसत आहे. हे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.