नाशिक : एकजूट महाराष्ट्र अभियानानिमित्त आयोजित महायुतीच्या समन्वय बैठकीत मार्गदर्शन करताना उदय सामंत. समवेत व्यासपीठावर दादा भुसे, नरहरी झिरवाळ, स्मिता वाघ, राहुल ढिकले आदी. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Industries Minister Uday Samant | ...तर महायुती विधानसभेला २०० जागा जिंकेल!

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : लोकसभेतील पराभवाचे आत्मचिंतन नव्हे, तर आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयाकरिता एकजुटीने लढण्यासाठी संघटित होऊन मंथन करण्याची ही वेळ असल्याचे नमूद करत तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांप्रमाणेच कार्यकर्तेही आपापसातील मतभेद, मनभेद विसरून एकत्र आल्यास विधानसभा निवडणुकीत महायुती २०० जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. (Mahayuti will get 200 seats in the assembly elections - Industry Minister Uday Samant's claim)

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे राज्यात 'एकजूट महाराष्ट्र अभियान' राबविण्यात येत आहे. याअंतर्गत येत्या ३० ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीचा महामेळावा आयोजित करण्यात आल्याची माहितीही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.

गोविंदनगर परिसरातील मनोहर गार्डन येथे महायुतीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वय बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खा. स्मिता वाघ, आ. योगेश टिळेकर, आ. अनिकेत तटकरे, सचिन जोशी, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, आ. मंजुळा गावित, आ. आमशा पाडवी, आ. सरोज अहिरे, माजी खा. हेमंत गोडसे आदी उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत खोटे नॅरेटिव्ह पसरवून महाविकास आघाडीने जनतेची दिशाभूल केली. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या रूपाने संधी चालून आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी संघटित होऊन विरोधकांकडून सोशल मीडियाद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवांना सडेतोड उत्तर द्यावे, असे नमूद करताना राज्यात एका पक्षाच्या नेत्यावर टीका झाली तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर रान पेटवले. त्या पक्षापेक्षा आपली ताकद अधिक आहे. आपणही आपल्या नेत्यावर टीका केली तर महाराष्ट्र कसा पेटवू शकतो हे दाखवून देण्याची गरज आहे, असे आवाहन सामंत यांनी मनसेचे नाव न घेता उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. अभियानांतर्गत येत्या ३० ऑगस्टला नाशिकमध्ये होणारा महामेळावा ऐतिहासिक ठरावा, यासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सामंत यांनी सांगितले.

राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत लोकहिताच्या असंख्य योजना हाती घेतल्या असून, या योजनांची पुस्तकरूपी माहिती महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचविण्याची गरज असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले. आ. तटकरे यांनी प्रास्ताविक केले. सचिन जोशी यांनी एकजूट महाराष्ट्र अभियानाची रूपरेषा मांडली. आ. टिळेकर, आ. फरांदे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष ठाकरे, रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

समन्वय बैठकीत 'असमन्वया'चे दर्शन

महायुतीच्या पहिल्याच समन्वय बैठकीत असमन्वयाचे दर्शन घडले. या बैठकीत भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची नावे घेतली गेली. परंतु, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांचे नावाचे विस्मरण आयोजकांना झाल्याने रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. महायुतीच्या बैठकीत मित्रपक्ष रिपाइंचे नाव घेण्यास लाज कसली, अशा शब्दांत कानटोचणी करताना रिपाइंला सन्मानाची वागणूक दिल्यासच महायुतीत समन्वय राहील, असा इशारा लोंढे यांनी दिला.

भुजबळांची अनुपस्थिती, सामंत यांची सारवासारव

बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा सुरू झाल्यानंतर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी सारवासारव केली. व्यासपीठावर काही पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित नाहीत. त्यांनी याबद्दल त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची परवानगी घेतली आहे, असे सामंत म्हणाले. काही लोक महायुतीत असले तरी ते मनाने नाहीत. अशा व्यक्ती महायुतीच्या व्यासपीठावर राहिल्या नाही तरी चालतील. विधानसभा निवडणुकीच्या येत्या दोन महिन्यांत निष्ठावंत कोण हे कळून चुकेल, असे सामंत यांनी सांगताच 'मी या बैठकीत उपस्थित आहे, अन्यथा मीडियावाले बैठकीला झिरवाळांची दांडी असे छापतील', असा उपरोधक टोला आ. झिरवाळ यांनी लगावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT