नाशिक : अंबड औद्याेगिक वसाहतीतील एका कारखान्यात प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून काम करणाऱ्या ऋषिकेश सातपुते (वय २६) या युवकाचे कंपनीतील अपघातात दोन्ही पाय निकामी झाल्याने, त्याचे देशसेवेचे स्वप्न भंगले आहे. तसेच नोकरी नसल्याने, त्याचा साखरपुडाही मोडला आहे. कंपनी व्यवस्थापनाने त्याचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी त्याच्या कुटुंंबीयांनी साेमवारी (दि.२३) औद्योगिक सुरक्षा व आराेग्य संचालनालय कार्यालयात ठिय्या आंदाेलन केले आहे.
आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियनचे शिक्षण घेतलेला ऋषिकेश सातपुते हा अंबड औद्याेगिक वसाहतीतील एका नामांकित कारखान्यात फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून नाेकरीस लागला. १४ मे राेजी नेहमीप्रमाणे कामावर असताना त्याच्या पायावर कारखान्यातील लाेखंडी प्लेट्स पडल्या. त्याला तातडीने उपचारार्थ हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर, त्याच्यावर शस्त्रक्रिया करून दाेन्ही पायांमध्ये राॅड टाकण्यात आले. त्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. मात्र, कारखाना व्यवस्थापन वैद्यकीय खर्च करत नसल्यामुळे व त्याला कंपनीत कायम करावे, या मागणीसाठी त्याच्या कुटुंबीयांनी औद्याेगिक सुरक्षा व आराेग्य संचालनालयाच्या कार्यालयात महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदाेलन केले. दरम्यान, ऋषिकेशला सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती. या अपघातामुळे त्याचे देशसेवेचे स्वप्न भंगले आहे. ज्या मुलीसोबत त्याचे लग्न होणार होते, त्या मुलीनेही नकार दिल्याने ठरलेला साखरपुड्याचा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आम्ही कंपनीत जाऊन माहिती घेतली. तसेच व्यवस्थापनाला काही बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत चाैकशी करता येते. चाैकशीनंतर संबंधित कारखाना व्यवस्थापनावर खटला दाखल करण्यात येईल.नरेश भारुळे, उपसंचालक, औद्याेगिक सुरक्षा विभाग, नाशिक
कंपनीत अपघात घडल्यानंतर कारखाना कायद्यानुसार औद्याेगिक सुरक्षा व आराेग्य संचालनालय कार्यालयास २४ तासांच्या आत कळवावे लागते. ४८ तासांच्या आत संपूर्ण माहिती द्यायची असते. मात्र, १४ तारखेला अपघात घडल्यानंतर कंपनीने १९ तारखेला कळवले. त्यामुळे कंपनीची सर्व प्रकारची चाैकशी करण्यात यावी.कैलास माेरे, अध्यक्ष, दुर्घटनाग्रस्त कामगार संघटना, नाशिक.