नाशिक : दिवाळी व्हेकेशनसाठी अनेक नाशिककर घराबाहेर पडणार असून, हवाई सफरचा आनंद घेण्याचे नियोजन त्यांनी व्हेकेशनमध्ये केले आहे. विशेषत: राज्याबाहेर जाण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य दिले जाणार असून, तिकिट बुकींगचा धडाका सुरू आहे. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्स कंपनीने दर तिप्पट वाढविले असून, महिनाअखेरपर्यंत ते कायम राहणार असल्याने, नाशिक विमानतळावरून सेवा देणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सला 'लक्ष्मी' पावली आहे.
नाशिकच्या ओझर विमानतळावरून इंडिगो कंपनीकडून सेवा दिली जाते. सध्या गोवा, इंदूर, अहमदाबाद, बेंगळुरू, नवी दिल्ली सेवा सुरू आहे. दिवाळीत अनेकांकडून गोव्यासह नवी दिल्ली, इंदूर या शहराला पर्यटनासाठी जाणे पसंत केले जात आहे. त्यामुळे या मार्गावरील तिकिटाचे दर तिप्पटीने वाढले आहेत.
एरवी गोव्याला जाण्यासाठी तीन ते साडेतीन हजार रुपयात इंदूर गाठणाऱ्यांना थेट १५ हजार ८९४ रुपये मोजावे लागत आहेत. गोव्यासाठी १२ हजार ८९४ रुपये आकारले जात असून, अन्य शहराच्या प्रवासाचेही तिकिट अशाचप्रकारे तिप्पटीने आकारले जात आहेत. विशेष म्हणजे तिकिटाचे दर वाढून देखील फ्लाइट हाऊसफुल असल्याने, वेटींगमध्ये प्रवाशांना राहावे लागत आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत हे दर कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.
आठवड्याचे दर असे
इंदूर - १५,८९४
गोवा - १२,८९२
अहमदाबाद - १२,७९७
हैदराबाद - १२,४८५
बेंगळुरू - १२,४८५
नवी दिल्ली - ८३२९
गोव्याला जाण्याचा कल
नाशिकहून थेट गोवा फ्लाइट असल्याने, पर्यटनासाठी अनेकांकडून गोव्यालाऋ पसंती दिली जात आहे. दिवाळीत सलग सुट्ट्या आल्याने, फ्लाइटने दोन दिवसात पर्यटन करणे शक्य असल्याने, त्यादृष्टीने नाशिककरांकडून प्लॅनिंग केले जात आहे. सध्या गोवा फ्लाइटच्या तिकिटाचे दर तिप्पटीने वाढले आहेत. मात्र, अशातही पर्यटकांकडून प्रतिसाद मिळत असल्याने, सध्या गोवा फ्लाइट हाऊसफुल आहे.
पिंकसिटी जयपूरही हाऊसफुल
काही महिन्यांपूर्वी बंद पडलेली नाशिक-इंदूर-जयपूर विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे. याशिवाय हैदराबाद व नवी दिल्लीसाठीही अतिरिक्त विमान सुरू होणार आहे. इंडिगो कंपनीने जाहीर केलेल्या हिवाळी मोसमासाठीच्या वेळापत्रकानुसार, २६ ऑक्टोबरपासून नव्या सेवांची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे अनेकांनी पिंकसिटी जयपूरला भटकंतीचे नियोजन केले असून, ऑनलाइन तिकिट बुकींग केले जात आहे. परिणाम सध्या नाशिक-इंदूर-जयपूर ही फ्लाइट देखील हाऊसफुल आहे.