लासलगाव (नाशिक): राकेश बोरा
भारतीय मातीत पिकणाऱ्या फळांनी परदेशी नागरिकांनाही आपल्या अविट गाेडीने भुरळ घातली असून, देशातून एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या १० महिन्यांत ४.१५ लाख मेट्रिक टन प्रक्रियायुक्त फळे, ज्यूस आणि काजूंची परदेशात निर्यात झाली आहे. यातून भारताला तब्बल ५,०३४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.
दहा महिन्यांत ४.१५ लाख मे. टन प्रक्रियायुक्त फळे, ज्यूसची निर्यात
देशाला ५,०३४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले
द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा पिकांच्या निर्यातीत महाराष्ट्राची आघाडी
देशाला हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे सफरचंदापासून ते आंबे, टोमॅटो, द्राक्ष अशा विविध फळांची विविधता लाभलेली आहे. त्यावर प्रक्रिया करून देशातून केवळ कच्चे नव्हे, तर उच्च मूल्यवर्धित उत्पादने जगाच्या बाजारात पोहोचवत आहे. त्यातही भारतातील कृषी क्षेत्रात फळे, ज्यूस आणि काजू प्रक्रिया उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे. भारतात वर्षभर विविध फळांचे उत्पादन घेतले जाते. फळे आणि भाजीपाल्यावर प्रक्रिया करून देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठांमध्ये निर्यात करण्याचे प्रमाण वाढत असून, त्यातून शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळत आहे.
भारतातून निर्यात होणाऱ्या प्रक्रियायुक्त उत्पादनांमध्ये सफरचंदाचा रस, आंब्याचा रस, द्राक्ष रस, लिंबाचा रस, टोमॅटो रस, जाम-जेली, वाळलेले व सुकवलेले फळ, स्वीट कॉर्न, शतावरी, ऑलिव्ह, चिप्स, काकडी यांचा समावेश आहे. तसेच प्रक्रियायुक्त काजूदेखील मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केले जात आहेत.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा आणि गुजरात या पश्चिम भारतातील राज्यांमध्ये फळांचे विपुल उत्पादन होते. त्यापैकी महाराष्ट्र विशेषतः द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, पेरू आणि चिकूसारख्या फळांमध्ये आघाडीवर आहे. या फळांवर प्रक्रिया करून त्यांचे विविध उत्पादने तयार केली जातात आणि निर्यात केली जातात. त्यामुळे महाराष्ट्र फळप्रक्रिया उद्योगात आघाडीवर राहिला आहे.
देशात आजही फळे व भाजीपाल्याच्या एकूण उत्पादनाच्या केवळ २ ते ५ टक्क्यांवरच प्रक्रिया केली जाते. परिणामी, देशाच्या मोठ्या कृषी उत्पादन क्षमतेचा पुरेपूर उपयोग होऊ शकलेला नाही. प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची शेल्फ लाइफ वाढते, यामुळे निर्यात सुलभ होते, त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढते.
'मेक इन इंडिया', 'प्रधानमंत्री किसान संपदा योजना' यांसारख्या योजना सरकारकडून राबवल्या जात असल्या तरी त्याची अंमलबजावणी गतीने झाली, तरच हा उद्योग जागतिक पातळीवर भारताला आघाडीवर नेऊ शकेल. प्रक्रिया उद्योगात तंत्रज्ञान, पॅकेजिंग आणि थेट शेतकऱ्यांशी संपर्क यामध्ये गुंतवणुकीची गरज आहे.