Ashok Kharat Income Tax raid Nashik Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case | भोंदू अशोक खरातच्या घरी इन्कम टॅक्स, ईडीची छापेमारी; आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू

नाशिकमधील ‘तृप्ताबाला’ बंगल्यावर कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची नोंद, महत्त्वाच्या पुराव्यांची तपासणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

Ashok Kharat Income Tax raid Nashik

नाशिक : भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. इन्कम टॅक्स विभागाने त्याच्या नाशिकमधील निवासस्थानी छापेमारी केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार, उत्पन्नाचे स्रोत तसेच बेनामी संपत्तीच्या संशयावरून इन्कम टॅक्स विभागाने तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील ‘तृप्ताबाला’ बंगल्यावर सोमवारी (दि.१३) सकाळपासून छापेमारी करण्यात येत आहे.

गेल्या दोन तासांपासून इन्कम टॅक्स विभागाची दोन पथके बंगल्यात सखोल तपास आणि चौकशी करत आहेत. घरातील कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची नोंद, तसेच महत्त्वाच्या पुराव्यांची तपासणी सुरू असल्याचे समजते. अधिकाऱ्यांकडून घरातील सदस्यांचीही चौकशी केली जात आहे.

दरम्यान, या कारवाईत केवळ इन्कम टॅक्स विभागच नव्हे तर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. संयुक्त कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रकरण अधिक गंभीर बनले असून पुढील काळात मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अशोक खरात प्रकरण आधीच विविध आरोपांमुळे चर्चेत असताना आता आर्थिक अनियमितता आणि बेनामी मालमत्तेच्या तपासामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. तपास यंत्रणांकडून पुढील काही दिवसांत अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

अशोक खरातला २० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी; पुढील सुनावणीकडे लक्ष

नाशिक : विविध गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात याला न्यायालयाने २० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, चौथ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी खरातसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र सध्या न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी पोलिसांना पुन्हा न्यायालयात यावे लागणार आहे.

खरातची वैद्यकीय तपासणी करून त्याला नाशिक कारागृहात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच उद्या पुन्हा एकदा पोलीस कोठडीसाठी सुनावणी होणार असून, त्या सुनावणीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगानेच खरातला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिर्डी पोलिसांकडूनही खरातचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, उद्याच्या सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय देते, यावर पुढील तपासाची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT