ऊन, वारा, पाऊस वातावरण अनुभवत उत्कंठत्त शिगेला पोहोचल्यानंर विजयी उमेदवाराची घोषणा होताच शिंदे गटाकडून जल्लोष करत गुलालाची उधळण करण्यात आली. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik | बाहेर मुसळधार पाऊस, आत गरमीचा माहोल

मतमोजणी केंद्रावर उपस्थितांनी अनुभवला ऊन-पावसाचा खेळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामामध्ये विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी पार पडली. दिवसभर घटकेत कडक ऊन, तर मध्येच मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा असे वातावरण असताना मतमोजणी कक्षात उपस्थितांमध्ये गरमागरमीचा माहोल पाहायला मिळाला. एकीकडे उमेदवार पसंतीक्रमाकडे लक्ष देण्यात गुंग, तर दुसरीकडे मतमोजणी करणारे अधिकारी, कर्मचारी एकूणच मतमोजणी प्रक्रिया सुलभ करण्याच्या मानसिकतेमध्ये होते.

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (दि. २६) मतदान पार पडले होते. या निवडणुकीच्या रिंगणात तब्बल २१ उमेदवार होते. त्यापैकी मुख्य लढत ही विद्यमान आमदार किशोर दराडे, मविआचे संदीप गुळवे, तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यामध्येच झाली. यासाठी झालेली मतमोजणी ही कोटा पद्धतीने करण्यात आली. कोटा ठरविण्यासाठीच तब्बल १५ तासांचा अवधी गेला. त्यानंतर पहिली पसंत, दुसरी पसंत या प्रकारे मोजणी करत कोटा पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले गेले. या सर्व घडामोडींना तब्बल ३० तास लागले.

मतमोजणीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी किशोर दराडे यांच्याकडे प्रमाणपत्र सुपूर्द केले.

या ३० तासांमध्ये मतमोजणी करणारी यंत्रणा, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी ऊन, वारा, पाऊस अशा वातावरणाचे सर्वच प्रकार अनुभवले. त्याबरोबरच बदलत्या पसंतीक्रमामुळे प्रत्येक फेरीअखेर उत्कंठा वाढत होती. अखेर चढाओढीमध्ये पहाटे 5.30 वाजता संदीप गुळवे यांच्या मतपत्रिका मोजताना किशोर दराडे यांनी कोटा पूर्ण केला. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी पहाटे एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली. मतमोजणीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर सकाळी 10.30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम यांनी प्रमाणपत्र सुपूर्द केले.

या निवडणुकीमध्ये सर्व मतदार शिक्षक बांधवांनी मला मोलाची साथ दिली. गेली सहा वर्षे त्यांच्यासाठी केलेल्या कामाची पावती या माध्यमातून मला मिळाली. आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न जुनी पेन्शन योजना मार्गी लावणे हा आहे. त्याबरोबरच आश्रमशाळा तसेच टप्पा अनुदानाबाबतचा प्रश्न मार्गी लावणे हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली आहे. शिक्षकांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवणे हे माझे कर्तव्य आहे.
आ. किशोर दराडे, विजयी उमेदवार.
महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा विजय हा अपेक्षित होता. शिक्षक हे विकासाचे व्हिजन ठेवून मतदान करत असतात. भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांना विकासाचे कार्य कोण करू शकते, याचा विश्वास असल्याने आज आमचे उमेदवार पुन्हा विजयी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्षकांनी विश्वास दाखवला आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेऊ. निवडणुकीदरम्यान अनेक वावड्या उठविण्यात आल्या, मात्र सुज्ञ मतदारांनी या बाबींना थारा दिला नाही. पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रात शिवसेना व महायुती अभेद्य असल्याचे अधोरेखित झाले.
दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक.
हा विजय सर्व शिवसैनिकांचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेली सहा वर्षे शिक्षकांसाठी सातत्याने झटणारे दराडे यांच्यासारख्या उमेदवाराला पुनश्च संधी दिली. या संधीचे सोने दराडे यांनी केले. उत्तर महाराष्ट्रात शिक्षक मतदारसंघामध्ये दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळवत दराडे यांनी इतिहास घडवला. मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळोवेळी केलेले दौरे, त्यांचे सूक्ष्म नियोजन आणि शिवसैनिकांची मेहनत या सर्वांचे हे फळ आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दराडे कटिबद्ध राहतील.
भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख, शिवसेना शिंदे गट, उत्तर महाराष्ट्र.
शिक्षक हा समाजातील सर्वात पुढारलेला वर्ग आहे. शिक्षक हे पात्रता असलेल्या उमेदवारावरच विश्वास ठेवू शकतात, हे त्यांनी दराडे यांना विजयी करत दाखवून दिले आहे. हा विजय म्हणजे शिवसेना उबाठा गटाचे बोलघेवडे प्रवक्ते संजय राऊत यांना मारलेली सणसणीत चपराक आहे.
विजय करंजकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
सर्व मतदार शिक्षकांचे आभार. आम्ही कमी पडलो असलो, तरी चांगले लोक जोडले गेले. त्याबाबत नक्कीच भविष्यात चांगले घडेल. या निवडणुकीत जरी अपयशी झालो असलो, तरीदेखील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध असेन. विचारांची लढाई होती. विजयी उमेदवार किशोरभाऊंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शिक्षकांची जुनी पेन्शन तसेच आणखी काही प्रश्न असतील, ते मार्गी लावावेत.
विवेक कोल्हे, द्वितीय पसंतीक्रमांकाचे उमेदवार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT