नाशिक : नाशिक पश्चिम, पूर्व आणि देवळालीपाठोपाठ नाशिक मध्य मतदारसंघातही महायुतीत बंडखोरी झाल्याचे चित्र असून, महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
विधानसभा निवडणुकीची रंगत आता वाढली आहे. इच्छुकांची वाढलेली संख्या सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी ठरली आहे. महायुती असो वा महाविकास आघाडी सर्वांनाच बंडखोरीचा फटका बसल्याचे चित्र आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या भाजपचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मनसेची उमेदवारी स्वीकारत भाजपच्या उमेदवार आ. सीमा हिरे यांना आव्हान दिले. शशिकांत जाधव यांनीदेखील अपक्ष अर्ज दाखल करत महायुतीला आव्हान दिले आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करत भाजपचे ॲड. राहुल ढिकले यांना आव्हान दिले आहे. गणेश गिते यांना उमेदवारी मिळाल्याने महाविकास आघाडीतील अन्य इच्छुक नाराज झाले आहेत. देवळाली मतदारसंघातही महायुती आणि महाविकास आघाडीत नाराजीचे फटाके वाजत आहेत. आता नाशिक मध्य मतदारसंघातही बंडखोरी झाल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. समीर भुजबळ यांच्या पाठोपाठ अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याने बंडखोरी केल्याने महायुतीचे टेन्शन वाढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते अपक्ष निवडणूक लढविणार आहेत. महायुतीने भाजप आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारी घोषित केली असताना रंजन ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी माजी खासदार समीर भुजबळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यासमोर समीर भुजबळ यांनी आव्हान निर्माण केले. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसून आले. आता त्यांच्या पाठोपाठ नाशिक मध्य मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या नेत्याने बंडखोरी केली आहे. रंजन ठाकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत गिते यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे, तर महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे दिसत आहे.