नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जडणघडणीत गोळवलकर गुरुजी यांच्या समवेत कार्य केलेले आरएसएसचे नाशिक विभाग कार्यवाह व एचपीटी महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक दादासाहेब अर्थात रमेशचंद्र धोंडोपंत रत्नपारखी (९६) यांचे शनिवार (दि.1) रात्री आठ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा सातपूर औद्योगिक क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक राजेश रत्नपारखी, सुन व नात असा परिवार आहे. रविवार (दि.२) आज अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
दादासाहेब रत्नपारखी हे लहानपणापासूनच संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी गोळवलकर गुरुजी समवेतही संघाचे काम केलेले आहे. त्यानंतर अनेक वर्षे ते संघाचे स्वयंसेवक व नाशिक शहर कार्यवाह, डोळे नाशिक जळगाव यातील जिल्ह्यांचे विभाग कार्यवाह म्हणूनही काम केले आहे. भोसला मिलिटरी एज्युकेशन संस्थेच्या जनरल सेक्रेटरी पदी तसेच शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी संघाचे काम अधिक जोमाने सुरू केले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी कारावास भोगला आहे. संघाचे जुने स्वयंसेवक व एक आदर्श व्यक्ती म्हणून ते नाशिककरांना परिचित होते. रविवार कारंजा येथील सुंदर नारायण मंदिरासमोर त्यांचा भव्य वाडा आहे. त्यांचे गंगापूर रोड येथील शंकरनगर येथे वास्तव्य होते. वयोमानामुळे ते घरातच होते. शनिवार (दि.1) अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.