इगतपुरी : साई निवाऱ्याचा कोसळलेला भाग. 
नाशिक

Igatpuri Sai Nivara slab collapse devotees injured|साई निवाराचा स्लॅब कोसळून इगतपुरीत १७ साईभक्त जखमी

पालखीवर ढिगारा कोसळल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी : शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांच्या मुक्कामाच्या ठिकाणी साईभक्तांवर स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. मुंबई-नाशिक महामार्गावरील साई निवारा परिसरात मुक्कामी असलेल्या साईभक्तांवर स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याने वाशिंद (ता. शहापूर) येथील तब्बल १७ साईभक्त जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व साईभक्त शिर्डीला दर्शनासाठी जात असताना मुक्कामाच्या ठिकाणी जेवण आटोपून विश्रांती घेत होते. त्याचवेळी अचानक स्लॅबचे गर्डर आणि फरशा कोसळल्याने एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १७) ठाणे जिल्ह्यातील वाशिंद-शहापूर परिसरातील साईभक्तांचा समूह शिर्डी दर्शनासाठी जात होता. प्रवासादरम्यान त्यांनी साई निवारा येथे जेवण केले. त्यानंतर काही भाविक विश्रांती घेत असतानाच रात्री साडेदहाच्या सुमारास इमारतीच्या स्लॅबचे गर्डर आणि फरशा अचानक कोसळल्या. सुरुवातीला सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती होती. मात्र, उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जखमींची संख्या १७ वर पोहोचली.

दोन भाविकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश असून, उर्वरित दहा जणांवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच शालिनी खातळे, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, इगतपुरी पोलिस व टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी बचावकार्यात मदत केली.

पालखीमुळे मोठी जीवितहानी टळली

कोसळलेल्या स्लॅबचा भाग पालखीवर पडल्याने खाली विश्रांती घेत असलेल्या भाविकांवर थेट स्लॅब कोसळण्याचा धोका टळला. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा घटनास्थळी होती.

अनधिकृत बांधकाम प्रश्न ऐरणीवर

या दुर्घटनेमुळे साई निवारा येथील बांधकामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्गावरील कसारा घाटात पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेल्या व्हॅलीत (दरीत) बांधकाम करण्यास परवानगी मिळत नाही. परंतु या व्हॅली परिसरात अनधिकृतपणे पाच ते सात मजल्यांच्या इमारतींचे बांधकाम सुरू असल्याने चौकशीची गरज आहे

पालखीमुळे मोठी जीवितहानी टळली

कोसळलेल्या स्लॅबचा भाग पालखीवर पडल्याने खाली विश्रांती घेत असलेल्या भाविकांवर थेट स्लॅब कोसळण्याचा धोका टळला. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा घटनास्थळी होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT