नाशिक

Nashik Rainfall Deficit | इगतपुरीत पाऊस घटल्यामुळे जिल्ह्यात २१ टक्के तूट; पिके संकटात येवला, मालेगाव, नांदगावमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती

Nashik Rainfall Deficit-इगतपुरीत पाऊस घटल्यामुळे जिल्ह्यात २१ टक्के तूट; पिके संकटात येवला, मालेगाव, नांदगावमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल २० टक्के कमी पाऊस झाल्यामुळे येवला, मालेगाव, नांदगाव तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, काही भागांतील पिके संकटात आली आहे. सप्टेंबर उजाडून चार दिवस झाले, तरी पावसाने अद्याप सरासरी गाठलेली नाही. जिल्ह्यात जूनपासून शुक्रवार (दि. ४) पर्यंत ६०९.८ मिमी पाऊस झाला असून, या कालावधीतील ७७४.७ मिमी सरासरीच्या तुलनेत तब्बल १६४.९ मिमीची तूट आहे.

जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या मुख्य पावसाळी तीन महिन्यांतही जिल्ह्याची स्थिती समाधानकारक नव्हती. या काळात सरासरी ७५०.२ मिमी पावसाची अपेक्षा असताना, प्रत्यक्षात ६०१.२ मिमी पाऊस झाला. त्यामुळे तीन महिन्यांतच १४८.३ मिमीची तूट राहिली. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण अवघे ८०.२ टक्के आहे. सप्टेंबरच्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यात केवळ ७.९ मिमी पाऊस झाला, तर येवला तालुक्यात सरासरीच्या केवळ ६५.६ टक्के पाऊस झाला असून, ११६.८ मिमीची तूट आहे. मालेगावात ७३.४ टक्के, नांदगावात ७४.५ टक्के, पेठमध्ये ७२.४ टक्के आणि सुरगाण्यात ८७.९ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्येही सरासरी गाठण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

इगतपुरीत ५५ टक्क्यांहून अधिक तूट

जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात जूनपासून आतापर्यंत ११८६.६ मिमी पाऊस झाला असला, तरी अपेक्षित २,६९१.५ मिमीच्या तुलनेत केवळ ४४.१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे तब्बल १,५०४.९ मिमीची तूट आहे. मागील वर्षी याच कालावधीत इगतपुरीत १,७२६.१ मिमी पाऊस झाला होता. म्हणजे यंदा मागील वर्षाच्या तुलनेतही ५३९.५ मिमी पाऊस कमी आहे.

काही तालुक्यांनी ओलांडली सरासरी

जिल्ह्यात पावसाचे चित्र समान नसून, काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचीही नोंद झाली आहे. निफाडमध्ये सरासरीच्या १३३.९ टक्के, दिंडोरीत १२१.३ टक्के, बागलाणमध्ये ११६.१ टक्के, त्र्यंबकेश्वरमध्ये ११८.३ टक्के, नाशिकमध्ये ११२.८ टक्के आणि कळवणमध्ये १०७.७ टक्के पाऊस झाला आहे, तर चांदवडमध्ये १०३.२ आणि देवळ्यात १००.९ टक्के पाऊस झाला आहे. मात्र या तालुक्यांतील पावसाने जिल्ह्याची एकूण तूट भरून निघालेली नाही. विशेषतः इगतपुरी, पेठ, सुरगाणा, मालेगाव, नांदगाव आणि येवला या भागांतील पावसाची कमतरता जिल्ह्याच्या सरासरीवर परिणाम करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT