नाशिक

Igatpuri Manjargaon Landslide | "मांजरगावात घरांवर भूस्खलनाचे संकट!; घराखालची माती वाहून गेल्याने 8 ते 10 कुटुंबांचे तातडीने स्थलांतर"

Igatpuri Manjargaon Landslide | पावसामुळे घराखालची माती वाहून गेल्याने ८ ते १० कुटुंबांचे स्थलांतर

पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील भाम धरणाच्या मागे असलेल्या मांजरगाव परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घरांच्या खालील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने अनेक घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. २४ तासांत जवळपास २०५ मिमी पावसाची नोंद झाल्याने जमिनीची धूप होऊन घरांना धोका निर्माण झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवाध्यक्ष लकी जाधव यांनी घटनास्थळी भेट देत बाधित नागरिकांची विचारपूस केली. त्यांनी तहसीलदारांकडे संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली असून, याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी लकी जाधव यांनी आमदार हिरामण खोसकर यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तसेच तहसीलदार अभिजित बारवकर, महसूल प्रशासन आणि घोटी पोलिसांचे निरीक्षक विजय शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीत जीव धोक्यात घालून नागरिकांना मदत केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसली तरी सततच्या पावसामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धोकादायक घरांचे तातडीने सर्वेक्षण करून कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

३९ जणांना शाळेत तात्पुरता निवारा

तहसीलदार अभिजित बारवकर यांनी तातडीने गावातील सुमारे ८ ते १० कुटुंबांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या कुटुंबांतील जवळपास ३९ नागरिकांना प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला आहे. महसूल व स्थानिक प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजना केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT