इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी नगर परिषद हद्दीतील गिरणारे येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत वन्यजीवांच्या अवयवासह एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने माहितीच्या आधारे गिरणारे येथे धाड टाकून संशयिताच्या घरातून वन्य प्राण्यांचे विविध अवयव जप्त केले.
या कारवाईत चंद्रकांत राजेंद्र माळी (३३, गिरणारे, इगतपुरी) यास ताब्यात घेतले. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार गिरणारे येथील एका व्यक्तीच्या घरात वन्यजीवांचे अवयव साठवून ठेवलेले आहेत.
यानुसार पथकाने घराची झडती घेतली असता चंद्रकांत माळी याच्या घरातून विविध वन्यजीवांचे अवयव जप्त केले. ही कारवाई उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहायक वनसंरक्षक कल्पना वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कांचन भुसाळ, वनपाल गावित, भोये, पवार, दिवाणे वनरक्षक पाटील, साबळे, धादवड, बागुल, गांगुर्डे, पोटिंदे, गावंडे मुजावर शेख आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
Chhagan Bhujbal News | "मीडियात चर्चा, पक्षात शांतता"; छगन भुजबळ यांनी खासदारकीच्या प्रश्नावर माध्यमांना गुंडाळलेप्राथमिक चौकशीत आरोपीने हे अवयव वेगवेगळ्या ठिकाणांहून आणल्याची माहिती दिली. धार्मिक व दैविक कार्यात त्यांचा वापर होत असल्याचे सांगितले आहे. आरोपीकडे बंदूक असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अधिक तपास सुरू आहे. कारवाईनंतर आरोपीस इगतपुरी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
संशयिताच्या घरातून या वस्तू जप्त
संशयित चंद्रकांत राजेंद्र माळी याच्या घरातून सांबरशिंग, काळवीट शिंग, रानडुक्कर दात, घुबडाचे अवयव, साळींदर काटे तसेच मोरपिसांचा समावेश आहे. या अवयवांची किंमत दोन लाख रुपये सांगण्यात येत आहे.