नाशिक : शहरातील तापमानाच्या पाऱ्याने मार्चच्या प्रारंभीच ३५ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका बसू लागला आहे. रविवारी (दि. २) शहरात कमाल ३५.६, तर किमान १७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमानातही कमालीची वाढ झाल्याने नागरिक चांगलेच घामाघूम होऊ लागले आहेत. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंशांपर्यंत राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गुरुवारी दि. २७ फेब्रुवारी महिन्यात शहराचे तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांची लाहीलाही झाली. गत तीन वर्षांत फेब्रुवारी महिन्यातील तापमानाचा हा उच्चांक ठरला. त्यानंतर तापमानात सातत्याने ३५ अंशांची नोंद होत आहे. जिल्ह्यात पुढील तीन दिवस वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान ३४-३५, किमान तापमान १४-१७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग २-७ कि.मी/प्रतितास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी वर्तविला आहे.
सध्या बंगालच्या उपसागराकडून वारे महाराष्ट्रात आल्यानंतर ते उष्ण व दमट होत असून, पुन्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे वळत असल्याने नाशिकसह जळगावला सरासरीपेक्षा २ ते ३ अंशाने तापमानात वाढ झाली आहे. हे हवामान २ दिवस राहण्याची शक्यता असून, त्यानंतर पुन्हा वातावरण सर्वसाधारण होईल, असे सांगण्यात येत आहे.
राज्यात गत दोन तीन दिवसांपासून आकाश हे कोरडे आणि निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे कमाल तापमानातदेखील वाढ झाली. मागील आठवड्यात कमाल तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत असतानाच उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
दिनांक- अंश सेल्सिअस
२६ फेब्रुवारी - ३४.३
२७ फेब्रुवारी - ३६.०
२८ फेब्रुवारी - ३५.८
१ मार्च - ३५. ४
२ मार्च - ३५.६