नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघाने पाच लाख माजी विद्यार्थी सदस्य नोंदणीचा टप्पा पार केला आहे. 10 सप्टेंबर 2020 रोजी स्थापना झालेल्या माजी विद्यार्थी संघाकडे गत पावणेपाच वर्षांपासून आजतागायत तब्बल पाच लाख सहा हजार 857 विद्यार्थ्यांनी सदस्यता नोंद केली. त्यामुळे मुक्त विद्यापीठ सर्वाधिक माजी विद्यार्थी सदस्य नोंदणी असलेले देशातील पहिले राज्य विद्यापीठ ठरले आहे.
मुक्त विद्यापीठाची स्थापना 1989 मध्ये झाली. आजतागायत सुमारे 55 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध शिक्षणक्रमांच्या पदव्या प्राप्त केल्या. 2020 मध्ये विद्यापीठात माजी विद्यार्थी संघाची स्थापना केली गेली. त्यात सहभागी होण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना संकेतस्थळ उपलब्ध करून दिले. त्यात त्यांनी कोणत्या विद्याशाखेतून कोणता शिक्षणक्रम कधी पूर्ण केला, सध्या ते कोणत्या आस्थापनेत. कोणत्या पदावर काम करत आहेत, या माहितीसह सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले. पाठोपाठ तंत्रज्ञानाचा व विविध समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करत माजी विद्यार्थ्यांचे संघटन वाढविण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या निरनिराळ्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे माजी विद्यार्थी संघाच्या सदस्य संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. विद्यापीठ दृकश्राव्य विभागाचे डॉ. संतोष साबळे हे स्थापनेपासून या माजी विद्यार्थी संघाचे सरचिटणीस म्हणून प्रमुख कार्यरत आहेत. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थांचा मेळावा आयोजित करण्याचे नियोजन असल्याचे कुलसचिव दिलीप भरड यांनी सांगितले.
विविध क्षेत्रांत कार्यरत विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांची नाळ विद्यापीठाशी जोडली जावी, त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी, विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, नवीन विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. त्याची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी आहे.प्रा. संजीव सोनवणे. कुलगुरू. मुक्त विद्यापीठ, नाशिक