जानोरी : खाद्य संस्कृतीत वाचन संस्कृती रूजवणाऱ्या भीमाबाई जोंधळे यांना राज्य सरकारचा मानाचा कविवर्य मंगेश पाडगावकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभांगातर्गत दिले जाणारे वाङमय पुरस्कारांची घोषणा झाली.
पुस्तकांच्या आई म्हणून सर्वत्र परिचित असणाऱ्या भीमाबाई जोंधळे यांना भाषा संवर्धक (व्यक्ती) या प्रकारासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपये दोन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 27 फेब्रुवारी अर्थात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या कार्यक्रमात भीमाबाई जोंधळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नाशिक येथील दहावा मैल येथे चहाच्या टपरी पासून वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी आपल्या हॉटेलमध्ये हजारो पुस्तके ठेवली आहेत. हॉटेलमध्ये येणारे ग्राहक खाण्याबरोबर पुस्तकेही वाचन करतात. या अनोख्या पुस्तकांच्या हॉटेलला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली भेटी देत आहेत. यावेळी मुलांना मराठी लेखक आणि वाचन चळवळीचे धडे दिले जातात.
मराठी वाचन चळवळीसाठी पुस्तकांच्या हॉटेलमध्ये ज्ञानपीठ विजेत्या कुसुमाग्रजांची अक्षरबाग, विंदा करंदीकरांचा मृदगंध वाचनकट्टा, वि. स. खांडेकर यांच्या नावाने अमृतवेल पुस्तकदालन सुरू केले आहे. यासोबत कवितेची भिंत, नाशिक दर्शन, आजीची शिदोरी, ज्ञानाचे प्रकाशदिवे, चित्रमय प्रदर्शन अशा विविध संकल्पना राबविल्या आहेत.
अनेक नामवंत साहित्यिकही या पुस्तकांच्या हॉटेलला भेट देत आहेत. वयाच्या 74 व्या वर्षी हे वाचन चळवळ वाढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भीमाबाई जोंधळे यांच्या कार्याची अनेक नामवंत संस्थांनी दखल घेतली असून, आतापर्यंत त्यांना 90 हून अधिक सत्कार सन्मान झाले आहेत. भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साहित्यिक वर्तुळासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भीमाबाई जोंधळे आणि प्रवीण जोंधळे यांचे अभिनंदन केले आहे.