नाशिक

Sakhar Shala for sugarcane workers children | ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी घरातच 'साखर शाळा'

शिक्षक बाळासाहेब अडसरे यांचा दिवाळी सुट्टीत अभिनव उपक्रम; शिक्षणापासून वंचित चिमुकल्यांना मिळतोय अक्षरओळखचा गोडवा

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : संदीप भोर

ऊस गोड असला तरी ऊसतोड कामगारांचे जीवन मात्र कष्टाने आणि संघर्षाने भरलेले आहे. कामाच्या शोधात गावोगावी भटकंती, उसाच्या फडाशेजारी उभारलेल्या तात्पुरत्या झोपड्या आणि उदरनिर्वाहासाठी पहाटेपासून सुरू असलेली धावपळ, या सगळ्यात त्यांच्या मुलांचे शिक्षण मात्र मागे पडते. अशा शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांच्या आयुष्यात अक्षरओळखचा प्रकाश निर्माण करण्यासाठी वडांगळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब अडसरे यांनी स्वतःच्या घरातच 'साखर शाळा' सुरू केली आहे. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टयांमध्ये सलग पंधरा दिवस ते हा उपक्रम राबवतात.

अडसरे यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजी खुर्द आहे. सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. परिसरात ऊसतोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या मुलांना निदान अक्षरओळख तरी व्हावी, दोन अक्षरे गिरविता यावीत, या उद्देशाने त्यांनी आपल्या घराचे अंगणच शाळेत रूपांतरित केले. दिवाळीच्या सुट्ट्यांचा उपयोग समाजातील या वंचित घटकांच्या मुलांसाठी करण्याचा त्यांचा हा उपक्रम विशेष ठरत आहे.

ऊसतोड हंगाम सुरू झाला की, हजारो कुटुंबे रोजगारासाठी स्थलांतर करतात. नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत ही कुटुंबे साखर कारखान्यांच्या परिसरात किंवा उसाच्या फडाशेजारी झोपड्या उभारून राहतात. आई-वडील पहाटेपासून ऊसतोडणीच्या कामाला जात असल्याने लहान मुले झोपडीत किंवा फडातच दिवस काढतात. मुलांची मूळ शाळा गावी आणि त्यांचे वास्तव्य कामानिमित्त दुसऱ्या गावात, अशी परिस्थिती निर्माण होते. परिणामी, या मुलांचे शिक्षण दरवर्षी खंडित होते.

६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळणे हा अधिकार असला, तरी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ही खंत अडसरे यांच्या मनाला लागल्याने त्यांनी साखर शाळेचा उपक्रम सुरू केला. ही साखर शाळा हा केवळ शिकविण्याचा उपक्रम नसून स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्याचा माणुसकीचा प्रयत्न आहे.

या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. अक्षरओळखपासून पर्यावरणाच्या संस्कारांपर्यंतचा हा प्रवास उपेक्षित बालकांच्या आयुष्यात आशेची पणती पेटविणारा उपक्रम आहे. परिसरात शिक्षणापासून वंचित असलेल्या अशा मुलांना शिकविण्यासाठी समाजातील इतरांनीही पुढाकार घेतल्यास या साखर शाळेचा गोडवा अधिक दूरवर पोहोचू शकेल.

शिक्षणासह संस्कारांचे धडे

घराच्या अंगणात छोटासा पांढरा फलक, हातात मार्कर घेऊन अडसरे जमिनीवर बसून मुलांना शिकवतात. अक्षरओळख, अंकज्ञान यांसह प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जातात. मुलांच्या चेहऱ्यावरील कुतूहल आणि शिकण्याची उत्सुकता या उपक्रमाला बळ देत आहे. केवळ पुस्तकी शिक्षण न देता स्वच्छता, चांगल्या सवयी, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही मुलांना समजावून सांगितले जाते. मुलांना खाऊ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचाही प्रयत्न केला जातो.

शिक्षणाचा गोडवा रुजविण्याचा प्रयत्न

उसाचा रस गोड असतो; मात्र तो मिळविण्यासाठी ऊसतोड कामगारांना किती कष्ट घ्यावे लागतात, याची जाणीव फार कमी जणांना असते. याच कामगारांच्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा गोडवा निर्माण करण्याचे काम अडसरे करीत आहेत. शिक्षक म्हणून शैक्षणिक जबाबदारी पार पाडतानाच दिवाळीच्या सुट्ट्यांतील पंधरा दिवस समाजातील वंचित मुलांसाठी देण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT