Accident Pudhari
नाशिक

Nashik Accident News | भरधाव कारच्या धडकेत तरुण अभियंत्याचा मृत्यू; ऐन भाऊबीजेच्या दिवशी कोथावदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Nashik Accident News | ऐन भाऊबीजेच्या दिवशी सणाचा आनंद साजरा करण्याऐवजी एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

पुढारी वृत्तसेवा

सिडको (पुढारी वृत्तसेवा):

ऐन भाऊबीजेच्या दिवशी सणाचा आनंद साजरा करण्याऐवजी एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गरवारे पॉईंट येथे भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अभियंता हितेश प्रकाश कोथावदे (३३) यांचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. ११) सकाळी ९.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मूळ रावळगाव (ता. मालेगाव) येथील कोथावदे कुटुंबासह नाशिकमधील लाडशाखीय वाणी समाजात शोककळा पसरली.

हितेश हे आडगाव शिवारातील श्रीरामनगर (जत्रा हॉटेलजवळ) येथे वास्तव्यास होते. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगसह एमबीए (एचआर) ही पदवी संपादित केली होती. तसेच 'ई प्रचार रिलीसेस' या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते. ते बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास दुचाकी (एमएच १५, जेबी २८९०) वरून मुंबई-आग्रा महामार्गाने द्वारकाकडून विल्होळीकडे जात होते.

गरवारे पॉईंट येथील गतिरोधकाजवळ त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. त्याच वेळी मागून भरधाव मारुती ग्रँड विटारा कारने (एमएच १८, सीई ३००२) कोथावदे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ते गंभीर होऊन बेहश झाले.

नातेवाईकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी हितेश यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कारचालक सूर्यप्रकाश विनोद श्रीवास्तव याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मृत हितेश हे रावळगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी प्रकाश धोंडूशेठ कोथावदे यांचे चिरंजीव, तर भूपेश कोथावदे यांचे मोठे बंधू होते. ते आडगाव-कोर्णाकनगर-अमृतधाम लाडशाखीय वाणी समाज मंडळाचे संचालक म्हणूनही कार्यरत होते. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. मितभाषी, मनमिळाऊ आणि बुद्धिमान उद्योजक म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. रावळगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT