चांदवड (नाशिक) : सुनिल थोरे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाचा साक्षीदार चांदवडचा ऐतिहासिक रंगमहाल आजघडीला अखेरच्या घटका मोजत आहे. गेल्या दशकभरात झालेले दुर्लक्ष आणि पुरातत्व विभागाच्या अनास्थेमुळे हा राजवाडा धूळखात पडला आहे.
या रंगमहालातून राजमाता अहिल्यादेवींचा राज्य कारभार चालायचा. या महालाची रचना, बांधणी अतिशय उल्लेखनीय होती. चांदवडच्या उत्तर पूर्व दिशेला गेलेल्या किल्ल्यांवर टाकसाळ होत्या. या ठिकाणी नाणी बनवल्या जायच्या. रंगमहालाचे संपूर्ण नक्षीकाम अतिशय सुंदर अन् देखणं होते. रंगमहालातून श्री रेणुका माता मंदिरापर्यंत भुयारी मार्ग आजही आहे. विविधतेने नटलेला हा महाल पाहण्यासाठी राज्यातून व परराज्यातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र गेल्या १० ते ११ वर्षांपासून नूतनीकरणाच्या नावाखाली पर्यटनासाठी बंद आहे. परिणामी, पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
पुरातत्व विभागाअंतर्गत रंगमहालाचे वैभव जतन करण्यासाठी डागडुजीचे कामकाज सुरू आहे. ते कासवगतीने होत आहे. कधी निधीअभावी तर कधी ठेकेदार-अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे काम बंद पडते. राजवाड्यात सर्वत्र धुळीचे अन् झाडाझुडुपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
रंगमहालाच्या डागडुजीवर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याने त्यास पुनवैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा फोल ठरली आहे. महालाची अधिकच दुरवस्था झाली आहे. लाकडांना केलेली पॉलिश व्यर्थ ठरुन लाकडे भुरकट दिसत आहेत. परिणामी, कामाचा दर्जा आणि त्यावरील खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चांदवडचा रंगमहाल खऱ्या अर्थाने राजमाता अहिल्यादेवी यांच्या कार्याची साक्ष आहे. तो दुरुस्तीच्या नावावर बंद ठेवल्याने पर्यटकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे हा ठेवा जमीनदोस्त होऊ नये एवढेच. संर्वधन कार्याआडून हा अर्थाजर्नाचा मार्ग बनल्याची खंत वाटते.गणेश निंबाळकर, जिल्हाध्यक्ष, प्रहार.
चांदवडची रेणुकामाता कुलदैवत असल्याने आम्ही नेहमी येथे येतो. आल्यावर रंगमहाल बघितल्याशिवाय आम्ही जात नाही. मात्र गेल्या दहा वर्षांपासून अंतर्गत कामकाजामुळे खंड पडला आहे. आजही रंगमहालाचे प्रवेशद्वार बंदच दिसले.अलका जाधव, पर्यटक, कोल्हापूर.
अहिल्यादेवींचा पराक्रम आम्ही शाळेत शिकलो. हा इतिहास खरा आहे कि खोटा यांची साक्ष चांदवडचा रंगमहाल देतो. मात्र हा महाल डागडुजीच्या नावाखाली पूर्णतः धूळ खात पडला आहे. रंगमहालाचे वैभव धोक्यात आले आहे. त्वरित काम पूर्ण करुन तो पर्यटकांसाठी खुला करावा.बबनराव गीते, पर्यटक, अहिल्यानगर.