दिंडोरी : राज्यभरातील एस.टी. बसस्थानकांवर केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षाच्या माध्यमातून महिला प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, वॉशरूम, चेंजिंग रूम, बेबी फीडिंग रूम आणि सॅनिटरी टॉवेल्ससारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश होता. मात्र, दिंडोरी बसस्थानकात तत्कालीन खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या निधीतून बांधण्यात आलेला हिरकणी कक्ष वापराविना धूळखात पडला आहे.
२०१८ मध्ये थाटामाटात या प्रतीक्षागृहाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, उद्घाटनानंतरही कक्षावर कायम कुलूप असल्याने महिला व विद्यार्थिनींना याचा लाभ मिळत नाही. शासनाच्या चांगल्या हेतूला स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हरताळ फासला जात आहे. या सुविधेचा प्रत्यक्ष उपयोग न झाल्याने शासनाचा निधी वाया गेला की तो ठेकेदारांच्या फायद्यासाठीच खर्च झाला, असा प्रश्न महिला प्रवासी उपस्थित करत आहेत. महिलांसाठी उभारलेले हे प्रतीक्षागृह उपयोगात येण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
बसस्थानकांवरील या प्रतीक्षागृहांचा योग्य वापर करून ते महिलांसाठी खुले करावे, अशी मागणी विद्यार्थिनी व महिला प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा प्रवाशांना आंदोलनाचा मार्ग पत्करण्याची वेळ येऊ शकते.
हिरकणी कक्षात वीज कनेक्शन नाही. हिरकणी कक्षाची निर्मिती झाल्यापासून कोणीही कक्षात येत नाही. महिला किंवा विद्यार्थिनींनी चावी मागितल्यास संबंधितांना चावी दिली जाईल.एल. पी. सूर्यवंशी, आगारप्रमुख, दिंडोरी, नाशिक.